मनपामार्फत स्वच्छता आरोग्य तपासणी मोहिमेस सुरवात
चंद्रपूर १५ जुलै – सध्या पाऊस थांबला असल्याने चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत स्वच्छता, आरोग्य तपासणी मोहिमेस सुरवात करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवली होती अश्या सर्व परीसरात ब्लीचिंग टाकले जात आहे, फॉगिंग केले जात असून नाल्यांवर फवारणी केली जात आहे. साथरोग प्रतिबंधासाठी आरोग्य विभागातर्फे सर्व पुरबाधितांची आरोग्य तपासणी केली जात आहे तसेच MPW ANM आणि आशा वर्कर मार्फत सर्वे करून सार्वजनिक बोरिंग – विहिरी, खाजगी बोरिंग – विहिरी यात ब्लीचिंग पावडर टाकण्यात येत आहे.
संभाव्य डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी सुरु असलेली डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु असुन ब्रीडिंग चेकर्स मार्फत सातत्याने पुरग्रस्त परिसरात तपासणी केली जात आहे. बांधकाम विभागामार्फत नाली कवर व इतर धोकादायक खड्डे यांची तपासणी करून भरण टाकल्या जात आहे तसेच यांत्रिकी विभागामार्फत आवश्यकतेनुसार पिण्याचे पाणी टँकर पुरविले जात आहेत.
सध्या पाऊस थांबला असला तरी खबरदारी म्हणुन महानगरपालिका शाळा तसेच इतर ठिकाणी असलेल्या १३२० पूरग्रस्तांना शाळेतच थांबविण्यात आले आहे. आयुक्त राजेश मोहीते व अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी कार्यरत असुन संभाव्य परिस्थितीसाठी सज्ज आहेत.