कौटुंबिक न्यायालय भंडारा येथे ‘‘स्वंयसिध्दा’’ उपक्रमाबाबत मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
भंडारा दि. 14 : कौटुंबिक न्यायालयात महिला पक्षकाराकरिता “स्वंयसिध्दा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महिलांचे आत्मभान जागृत करणे, त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदत उपलब्ध करून देत त्यांना स्वावलंबी करणे. या हेतूने कौटुंबिक न्यायालय, भंडारा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला “स्वयंसिद्धा”या उपक्रमाचे मुख्य घटक आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नुकतीच महिला पक्षकारांकरिता विविध शासकीय योजनाबाबत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश प्रसाद पालसिंगकर, वकील संघाचे अध्यक्ष रवि वाढई, आरसेटी निदेशक मिलींद इंगळे, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक सोनु उके, महात्मा गांधी नॅशनल फेलो मिरा मांजरेकर, अण्णासाहेब पाटील महामंडळ जिल्हा समन्वयक अधिकारी सुहास बोंदरे हे उपस्थित होते.
मिलींद इंगळे, निदेशक आरसेटी भंडारा यांनी त्यांच्या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या 15 दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच सदर मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा येथील सहायक आयुक्त सुधाकर झळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित प्रतिनिधीं सोनु उके यांनी कौशल्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राबविण्यात येणारे विविध अभ्यासक्रम जसे ब्युटी पार्लर, शिवणकाम, नर्सिंग क्षेत्रातील कोर्सस इ. मध्ये निशुल्क प्रवेश घेवून प्रशिक्षणाअंती प्रमाणपत्र आणि रोजगार व स्वंयरोजगार प्राप्त करावा, असे आवाहन उपस्थित महिला पक्षकारांना केले.
मिरा मांजरेकर यांनी महिलांकरिता आकांक्षा प्रकल्पाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ॲडव्हांस डिप्लोमा इन सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग या 18 महिन्यांच्या निशुल्क निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाची सविस्तर माहिती यावेळी दिली. तसेच सुहास बोंदरे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगारासाठी कर्ज व्याज परतावा योजना बाबत सविस्तर माहिती देवून मार्गदर्शन केले.