व्यायामशाळा, क्रीडांगण व युवक कल्याण अनुदान योजनेअंतर्गत प्रस्ताव आमंत्रित
भंडारा, दि. 14 : जिल्ह्यातील तरुण पिढीमध्ये व्यायामाची आवड निर्माण करणे तसेच शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठी व क्रीडा संस्कृतीचे संर्वधन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नवीन क्रीडा धोरणांतर्गत सन 2022-23 या सत्राकरिता व्यायामशाळा विकास, क्रीडांगण विकास व युवक कल्याण विषयक अनुदान योजनेअंतर्गत विहित नमुन्यातील प्रस्ताव 30 जुलै 2022 पर्यंत मागविण्यात आले आहे.
व्यायामशाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत ओपन जिम व व्यायाम साहित्य खरेदी करणे तसेच नवीन व्यायामशाळा बांधकाम करणे यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. क्रीडांगण विकास अनुदान योजनेतून क्रीडांगण समपातळीत करणे, 200/400 मीटर धावनमार्ग तयार करणे, विविध खेळांची प्रमाणित क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनृह बांधणे, भांडारगृहे बांधणे, पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडांगणाभोवती भिंत किंवा तारेचे कुंपण तयार करणे या बाबींसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते. जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये याशिवाय आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळा तसेच ग्रामपंचायत, शासकीय यंत्रणा इत्यादींना या योजनेंतर्गत मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदान देय आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल, भंडारा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांनी केले आहे.