स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जागतिक युवा कौशल्य दिनाचे आयोजन
चंद्रपूर,दि. 14 जुलै : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 जुलै 2022 रोजी जागतिक युवा कौशल्य विकास दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यकम यशस्वीरित्या राबविणारे जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालयातील अंमलबजावणी करणारे अधिकारी / कर्मचा-यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सन 2021-22 मध्ये जास्तीत जास्त रोजगार / स्वयंरोजगार प्राप्त करून देणा-या व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेचा गौरव तसेच मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात येईल. सदर कार्यक्रम 15 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता प्रशासकीय भवन, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सभागृहात होणार आहे. दुस-या सत्रामध्ये दुपारी 1 वाजता शारीरिक क्षमता चाचणी या विषयावर फिटनेस करीअर अकादमीचे संचालक रोशन भुजाडे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.