एल.जी.बी.टी. व वारांगना समुदायाला मिळणा-या योजनांचा आढावा
चंद्रपूर, दि. 11 जुलै : जिल्ह्यात वास्तव्य करणाऱ्या लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर (LGBT) व वारांगना या समुदायाला शासनाच्या लागू असलेल्या योजनांबाबत उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अश्विनी मांजे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. तसेच या समुदायाला निवडणूक ओळखपत्र, राशन कार्ड, आधार कार्ड, बँक खाते या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.
शासनाने निर्गमित केलेल्या नवीन शासन आदेशानुसार लेस्बियन, गे, बायसेक्शुअल व ट्रान्सजेंडर आणि वारांगना समुदायाला समाजात समान न्याय, समान वागणूक, समान हक्क, समान अधिकार व समान संधी उपलब्ध व्हावी या हेतूने व त्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करतांना येत असलेल्या अडचणींना दूर करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे अश्विनी मांजे यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यात नोंदणी असलेल्या काही लेस्बियन, गे, बायसेक्शुअल व ट्रान्सजेंडर व वारांगना यांना लाभ देण्यात आला असून उर्वरित समुदायाची लवकरात लवकर नोंदणी करावी त्यांना देखील या योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
बैठकीला पुरवठा विभागाचे भारत तुमळे, मंगेश कुरेकर श्री.कुळमेथे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार, संबोधन ट्रस्टचे राज काचोळे यांची उपस्थिती होती.