धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार स्वयंम योजनेचा लाभ
भंडारा, दि. 11 : विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागामार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना सुरू करण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या, परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ मिळेल. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट रक्कम वितरित करण्यात येईल. केंद्र शासनाच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीकरिता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ देण्यात येईल. तथापि, दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी योजनेचा लाभ मिळणार नाही. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इत्यादीमार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयात, संस्थेमध्ये व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा.
या आहेत अटी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी धनगर समाजातील असावा. अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली संस्था ज्या शहरात आहे, त्या शहराचा विद्यार्थी रहिवासी नसावा. विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा व इयत्ता 12 वीमध्ये किमान 60 टक्के गुण प्राप्त असावेत. वय 28 पेक्षा अधिक नसावे. विद्यार्थी राहत असलेल्या खाजगी वस्तीगृह भाडे करारनामा इत्यादी बाबतचा पुरावा, महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र या कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, सिव्हिल लाईन ,भंडारा या कार्यालयास सादर करावा.