पूर नियंत्रण कक्ष 24 तास संपूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवा – पालकसचिव अनुप कुमार
Ø संभाव्य पूर परिस्थितीत सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवण्याचे निर्देश
चंद्रपूर दि. 7 जुलै : चंद्रपूर हा पर्जन्यमानाचा जिल्हा आहे. जिल्ह्यातून सहा-सात नद्या वाहत असून पावसाळ्याच्या दिवसात या नद्यांना पूर येतो. एवढेच नाही तर गोसीखुर्द आणि संजय गांधी सरोवरातून पाणी सोडले तर त्याचा फटका नदीकाठच्या गावांना बसतो. हा इतिहास बघता संभाव्य पूर परिस्थितीत सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवावा. तसेच पूर परिस्थितीमध्ये जीवित किंवा वित्तहाणी टाळण्यासाठी नागरिकांना पहिलेच अवगत करणे गरजेचे आहे. त्यासाठी पूर नियंत्रण कक्ष 24 तास संपूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवावा, अशा सुचना अपर मुख्य सचिव (सहकार व पणन) तथा जिल्ह्याचे पालक सचिव अनुप कुमार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात संभाव्य पूर परिस्थिती तसेच खरीप हंगाम तयारी आदी विषयांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम आदी उपस्थित होते.
मान्सुनच्या आगमनानंतर जिल्ह्यातील संभाव्य पूर परिस्थिती आणि कृषी व्यवस्थापनबाबत आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पालक सचिवांना सुचना केल्या आहेत, असे सांगून श्री. अनुप कुमार म्हणाले, चंद्रपूरलासुध्दा पुराचा इतिहास आहे. पूर परिस्थितीत नियंत्रण कक्षाची महत्वाची भुमिका असते. त्यासाठी तेथे 24 तास अधिकारी – कर्मचारी उपलब्ध असला पाहिजे. ज्यांची ड्यूटी पूर नियंत्रण कक्षात लावण्यात आली आहे, ते खरेच तेथे उपस्थित राहतात की नाही, याची खात्री करण्यासाठी प्रशासनाच्या अधिका-यांनी कोणत्याही वेळेस आकस्मिक भेट द्यावी. ड्युटी मध्ये गैरहजर आढळल्यास सक्त कारवाई करावी. या कालावधीत कोणालाही दीर्घ रजा देऊ नये. तसेच अधिकारी व कर्मचा-यांना मुख्यालयी राहण्याच्या सुचना द्याव्यात.
इरई नदीपात्रात पूर रेषेच्या खाली घरे असणाऱ्या नागरिकांना स्थलांतर करण्याची जबाबदारी मनपाची आहे. त्यांना याबाबत सतर्क करावे. तसेच पूर आला तर नागरिकांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यासाठी मोठे सभागृह, समाज मंदीर आदींची व्यवस्था करून ठेवावी. पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे खड्डे तातडीने बुजवावे.
आरोग्य विभागाचा आढावा घेतांना श्री. अनुप कुमार म्हणाले, पावसाळ्यात जलजन्य आजारांच्या प्रमाणात मोठी वाढ होते. डायरिया, कॉलरा, मलेरीया, डेंग्यू आदी रोगांना प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयामध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध राहील, याबाबत नियोजन करून सर्व आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवावी. कोव्हीड लसीकरणामध्ये चंद्रपूर जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे. पहिला डोज 96.43 टक्के लोकांनी तर दुसरा डोजचे प्रमाण 82.40 टक्के आहे. गावात / शाळांमध्ये लसीकरणाचे सत्र आयोजित करावे. दोन वर्षे कोव्हीडमध्ये गेल्यावर आता कोव्हीड व्यतिरिक्त इतरही महत्वाच्या कामावर प्रशासनाने लक्ष द्यावे.
पीक कर्जवाटपाचा आढावा घेतांना ते म्हणाले, राष्ट्रीयकृत बँकांची कर्जवाटपाची गती अतिशय कमी असून काही बँकाची कामगिरी तर फारच निराशाजनक आहे. 31 जुलैपर्यंत सर्व पात्र शेतक-यांना कर्ज मिळाले पाहिजे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चांगली कामगिरी केली आहे. पीक कर्जवाटपाबाबत जिल्हाधिका-यांनी बँकर्सचा नियमित आढावा घ्यावा. तसेच ज्या बँका चांगले काम करणार नाही, त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सुचना पालकसचिवांनी दिल्या.
यावेळी त्यांनी पीक पेरणी, संभाव्य दुबार पेरणीची परिस्थिती, बियाणे, खते व इतर निविष्ठांची उपलब्धता, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना, जलजीवन मिशन, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर झेंडा अभियान आदींबाबत आढावा घेतला.
बैठकीचे सादरीकरण जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, महावितरणच्या अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगळे यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.