७ जणांवर कारवाईचे निर्देश / अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी केली स्वच्छतेची पाहणी
चंद्रपूर ६ जुलै – चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी आज स्वच्छतेबाबत शहराची पाहणी केली असता काही जागी अस्वच्छता आढळल्याने जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले.
आज अतिरिक्त आयुक्त यांनी जटपुरा गेट ते संत केवलराम चौक ते विदर्भ हाऊसिंग चौक ते रामसेतु पुल या भागात पाहणी केली असता सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांचे काम योग्य रीतीने न केल्याचे आढळुन आले. काही जागी रोड झडाई व्यवस्थित झाली नव्हती, रस्त्यावर बांधकाम साहीत्य पडल्याचे आढळले, काही जागी टाक्यांमध्ये पाणी जमा करून ठेवल्याचे तर काही जागी साचलेले पाणी आढळले. दिलेल्या निर्देशानुसार कामे होत नसल्याचे आढळल्याने जबाबदार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आले आहे. योग्य तो खुलासा प्राप्त न झाल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होण्याचे संकेत आहेत.
महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांमार्फत दररोज सकाळी पुर्ण शहरातील रस्त्यांची सफाई करण्यात येते. नियमित सफाई करतांना कुठेही अस्वच्छता, कचरा राहु नये यादृष्टीने मनपातर्फे नियोजन करण्यात येते. त्यादृष्टीने सर्व कर्मचाऱ्यांनी आपली कामे जबाबदारीने करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त यांनी दिले आहेत.