12 जुलै रोजी 8 ते 16 वर्षाखालील खेळाडूंच्या जलतरण निवड चाचणीचे आयोजन
चंद्रपूर, दि. 6 जुलै : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत क्रीडा प्रबोधिनी, पुणे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने व जलतरण खेळाच्या प्रशिक्षणाकरिता, संघ उभारणी करीता नव्याने खेळाडू भरती करण्यात येणार आहे. याकरीता नागपूर विभागातील 8 ते 16 वर्षाखालील खेळाडूंच्या जलतरण निवड चाचणीचे आयोजन दि. 12 जुलै 2022 रोजी सकाळी 8 वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे करण्यात येणार आहे.
निवड चाचणीकरीता मानके निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये खेळाडू किमान राज्यस्तरावर सहभागी असणे आवश्यक (कौशल्य चाचणी), खेळाडू राज्यस्तर स्पर्धेत प्राविण्य प्राप्त असावा. तसेच निवड चाचणीत खेळाडूंची उंची, शारीरिक क्षमता, कौशल्य चाचणी, खेळातील कामगिरी या बाबी विचारात घेण्यात येतील. त्याचप्रमाणे सदर खेळाडूंच्या जलतरण चाचण्या जसे 50 मी.फ्री, 100 मी. मेन स्ट्रोक, 400 मी.फ्री स्टाइल (14 वर्षाआतील), 800 मी. फ्रीस्टाइल (14 वर्षावरील), 800 मी. धावणे शोल्डर लेंथ इत्यादी निवड चाचणीचे निकषानुसार चाचण्या घेण्यात येणार असून याद्वारे निवड करण्यात येणार आहे. निवड चाचणीस येताना खेळाडूंनी जन्मतारखेचा दाखला सोबत आणणे आवश्यक आहे. निवड चाचणी ठिकाणी फक्त खेळाडूची निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रवास व भोजन खर्च खेळाडूंनी स्वखर्चाने करावयाचा आहे.
तरी, चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे यांनी केले आहे.