सायबर सुरक्षा आणि लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण
Ø विधी सेवा प्राधिकरण व पोलिस विभागातर्फे जागरुकता उपक्रम
चंद्रपूर दि. 6 जुलै : बालक हे देशाचे भविष्य असून त्यांचे योग्य प्रकारे पालन-पोषण व्हावे तसेच त्यांना अत्याचारांपासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पोलिस अधिक्षक कार्यालयाच्यावतीने बी.जे.एम. कार्मेल अकादमी येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा आणि लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण (पोक्सो कायदा) याबाबत जागरुकता उपक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमीत जोशी, अधिवक्ता आम्रपाली लोखंडे, भरोसा सेलच्या पोलिस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे, सायबरतज्ज्ञ मुजावर अली आदी उपस्थित होते.
बालकांचे योग्य प्रकारे संवर्धन होऊन त्यांचा निकोप, शारीरिक, मानसिक, बौध्दिक आणि सामाजिक विकास व्हावा, त्यांचे बालपण सुदृढ राहावे, बालकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, कोणत्याही प्रकारचे शोषण होऊ नये, या उद्देशाने केंद्र सरकारने बालकांच्या संरक्षणार्थ ‘दी प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन र्फाम सेक्सुअल ऑफेन्स (POCSO) ॲक्ट 2012 या नावाने विशेष कायदा पारित केला आहे. तसेच सायबर अपराधांच्या वाढत्या घटना पाहता सायबर सुरक्षा व उपाययोजना या विषयावर शाळा – महाविद्यालयांमध्ये जागरुकता उपक्रम घेण्याच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना श्री. जोशी म्हणाले, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपले लक्ष शिक्षणावर तसेच सकारात्मक विषयावर केंद्रीत करून आपले भविष्य उज्वल करावे. कुठल्याही लैंगिक शोषण / अत्याचारास बळी पडू नये. प्रसंगी शोषण / अत्याचार घडत असल्यास त्वरीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा पोलिसांची मदत घ्यावी. श्रीमती लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याबाबत परिपूर्ण माहिती देऊन बालकांना त्यांचे अधिकार व संरक्षण विषयक कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन केले.
पोलिस उपनिरीक्षक श्रीमती वाकडे यांनी ‘गुड टच, बॅड टच’ बाबत माहिती देऊन मुला-मुलींनी शैक्षणिक वयात काय चुका करू नये, केल्यास त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, याबाबत अवगत केले. तर सायबरतज्ज्ञ मुजावर अली यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणादरम्यान इंटरनेट / मोबाईलच्या माध्यमातून केलेल्या दुरुपयोगाच्या दुष्परिणामबाबत घडलेल्या घटनांची उदाहरणे दिली. त्यामुळे मोबाईलचा सदुपयोग करून आपले जीवन यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन पोलिस नायक संतोष पानघाटे यांनी केले. यावेळी बीजेएम कार्मेल अकादमीचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सायबर पोलिस स्टेशन येथील अधिकारी कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.