राजेदहेगाव येथे अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींच्या
शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू Ø इयत्ता 6 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश
भंडारा, दि. 5 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथे अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींच्या शासकीय निवासी शाळेत शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता इयत्ता सहावी ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन व ऑनलाईन सेमी इंग्रजी माध्यमासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
इयत्ता सहावीच्या 40 जागेसाठी आणि इयत्ता सातवी, आठवी, नववी व दहावीच्या प्रवर्गनिहाय रिक्त जागेकरिता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रवेशाकरिता आरक्षण अनुसूचित जाती 80 टक्के, अनुसूचित जमाती 10 टक्के, विमुक्त जाती/ भटक्या जमाती 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के, दिव्यांग प्रवर्ग 3 टक्के अशा प्रकारे प्रवेश करता येते. प्रवेश घेण्यासाठी गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, महाराष्ट्र निवासाचे प्रमाणपत्र, विद्यार्थी संचयी नोंदपत्रक, विद्यार्थ्याचे आधारकार्ड, बँकेचे पासबुक, वैद्यकीय प्रमाणपत्र व पालकांचे हमीपत्र आवश्यक आहे.
ज्या विद्यार्थीनींना शासकीय निवासी शाळेत प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांनी निवासी शाळा राजेदहेगाव येथून अर्ज प्राप्त करुन किंवा https://forms.gle/GPtYZXWJPG2wWamu5 या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व मुख्याध्यापक नरेंद्र मेंढे यांनी केले आहे.