संभाव्य कोरोना लाटेचा धोका टाळण्यास करा लसीकरण – आयुक्त राजेश मोहिते
१२ ते १७ वयोगटासाठी शाळांमध्ये केले जाणार लसीकरण
चंद्रपूर ४ जुलै – संभाव्य ४ थ्या कोरोना लाटेचा धोका टाळण्यासाठी सर्व शाळकरी मुले व नागरीकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.
१८ वर्षावरील १०० टक्के नागरीकांनी लसीकरणाचा पहिला डोज घेतलेला आहे. तर ८६ टक्के नागरीकांनी दुसरा डोज घेतला आहे. धोका टाळण्यास ज्यांनी दुसरा डोज घेतलेला नाही त्यांनी तो त्वरीत घ्यावा. कोरोना रुग्णांचे प्रमाण आता पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कुठेही गाफील राहू नका, लसीकरण करून आपली व आपल्या परिवाराची काळजी घेणे आवश्यक आहे.
आता शाळा नियमित स्वरूपात सुरु झाल्या आहेत त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत शाळकरी मुलांसाठी त्यांच्या शाळेतच लसीकरण करण्याची मोहीम राबविली जाणार आहे. १२ ते १४ वयोगटासाठी कॉर्बीव्हॅक्स व १५ ते १७ वर्षे वयोगटासाठी कोवॅक्सिन लस दिली जाणार आहे. मनपा आरोग्य विभागामार्फत शाळांना संपर्क साधुन ठराविक दिवशी मोहीम राबविली जाणार आहे. तरी पालकांनी शाळा प्रमुखांशी संपर्क साधुन आपल्या पाल्याचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे केले जात आहे.