कळमना येथे कापसाचे 3 लक्ष 94 हजार 470 रुपयांचे अनधिकृत बियाणे जप्त
Ø तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पथकाची कारवाई
चंद्रपूर, दि. 28 जून : बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे बोगस बीटी कापसाचे अंदाजित रक्कम 3 लक्ष 94 हजार 470 रुपयांचे अनधिकृत बियाणे तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांच्या पथकाने जप्त केले.
बल्लारपूर तालुक्यातील कळमना गावात जलसंपदा विभागाच्या पळसगाव आमडी उपसा सिंचन प्रकल्प इमारतीमध्ये बोगस व प्रतिबंधित कापूस बियाण्याचा साठा असल्याची गुप्त माहिती तालुका कृषी अधिकारी तथा तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्रीधर चव्हाण यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनात कृषी व पोलीस पथकासह सदर इमारतीची पाहणी केली असता बोगस अनधिकृत बीटी कापसाचे बियाणे आढळून आले. तालुका कृषी अधिकारी व पोलीस पथकाने सदर ठिकाणाहून 3 लक्ष 94 हजार 470 रुपये किमतीचे 487 पाकीट बियाणे जप्त केले.
तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सदर प्रकरणी पोलीस स्टेशन, बल्लारपूर येथे बियाणे नियम 1968, बियाणे नियंत्रण आदेश 1983, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा 2009, पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986, भारतीय दंड संहिता कलम 420 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्रीधर चव्हाण, कृषी सहायक आर.ए.अहिरराव, बी.आर.हराळ, एस.आर.राठोड, सहायक पोलिस उपनिरीक्षक धनंजय गिन्नलवार व पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.