रेन वॉटर हार्वेस्टींग करणाऱ्यांना व्यावसायिकांचा पाठींबा हॉटेल जायका फुड अँड ड्रींक्स देणार १० टक्के सुट
चंद्रपूर २५ जुन – चंद्रपूर शहर महानगरपालीकेद्वारे रेन वॉटर हार्वेस्टींग प्रोत्साहन मोहीमेस आता शहरातील व्यावसायिकांचा पाठींबा मिळु लागला असुन हॉटेल जायका फुड अँड ड्रींक्सतर्फे उपहारगृहात येणाऱ्या नागरीकांनी रेन वॉटर हार्वेस्टींग केले असल्यास १० टक्के सुट खाद्यपदार्थांवर देण्यात येत आहे.
शहरात भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. यावर उपाययोजना म्हणून पावसाळ्यात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा जमिनीत जिरविण्याची आवश्यकता आहे. पाण्याची पातळी वाढविण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेमार्फत रेन वॉटर हार्वेस्टींग उपक्रम हाती घेण्यात आला आहे रेन वॉटर हार्वेस्टींगची अमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी मालमत्ताधारकांना मनपाकडून घराच्या छताच्या आकारमानानुसार ५ हजार, ७ हजार, १० हजार असे वाढीव अनुदान तथा पुढील ३ वर्षापर्यंत मालमत्ता करात २ टक्के सूट देण्यात येत आहे.
राष्ट्रवादी नगर येथील हॉटेल जायका फुड अँड ड्रींक्सतर्फे खाद्य पदार्थांवर १० टक्के सुट देणारे कुपन शहरातील रेन वॉटर हार्वेस्टींग करून देणाऱ्या कंत्राटदारांना देण्यात आले असुन नागरीकांनी आपल्या घरी रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणा बसविल्यावर कंत्राटदारांकडुन सदर कुपन घ्यावे. अधिकाधिक नागरीकांनी आपल्या घरी रेन वॉटर हार्वेस्टींग करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.