सोयाबीन पिकाचे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशकाची पेरणीपूर्व बीजप्रक्रिया अवश्य करावी- डॉ.विजय एन.सिडाम
कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर तर्फे ‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान’ अटारी पुणे या योजनेअंतर्गत सोयाबीन या पिकाचे जिवती तालुक्यातील कोदपूर या गावांमध्ये एकूण 50 समूह प्रथम रेषीय प्रात्यक्षिके एकूण 20 हेक्टर वर राबविण्यात येत आहे. याप्रसंगी एक दिवसीय एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कु. पल्लवी.एस गोडबोले, तालुका कृषी अधिकारी जिवती होते. या प्रशिक्षणाचे प्रमुख मार्गदर्शक आणि आयोजक डॉ.विजय एन.सिडाम, विषय विशेषज्ञ, कृषी विस्तार यांनी सोयाबीनच्या उत्पाद्न वाढीसाठी महत्वाच्या बाबी मध्ये – पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बोझीन 37.5 टक्के अधिक थायरम 37.5 टक्के या संयुक्त बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी त्यामुळे कॉलर रोट, चारकोल रोट व रोप अवस्थेतील रोगापासून संरक्षण होते. वरील बुरशीनाशकाच्या बीच प्रक्रियेनंतर थायोमेथोक्झाम 30 टक्के (एफएस) या किटकनाशकाची 10 मिली प्रति किलो प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच सोयाबीन पिकास रायझोबीयम जॅपोनिकम व स्फुरद विरघळणारे जिवाणू यांची प्रत्येकी २५० ग्रॅम/१० किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी व बियाणे सावलीत वाळवून पेरणीस वापरावे. बीजप्रक्रिया करताना बियाणे हलक्या हाताने चोळावे तसेच प्रथम बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करावी व नंतर जैविकखताची बीजप्रक्रिया करावी. बियाणे प्रमाणे – सोयाबीनची उगवणशक्ती ७० टक्केच्यावर असल्यास हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे. .पेरणी १५ जून ते १५ जुले दरम्यान करावी. 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून पेरणी करावी. पेरणी ४५ x ५ सें.मी. अंतरावर करावी. पेरणी करताना बियाणे ३-५ सें.मी. पेक्षा जास्त खोल जाणार नाही, याची काळजी घ्यावी. बी बी एफ या यंत्राचा वापर नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास होणाऱ्या धोका टाळण्यासाठी पेरणी बीबीएफ (रुंद वरंबा सरी)या पद्धतीने करावी किंवा दर चार ओळींनंतर चर काढावेत त्यामुळे पावसाचे पाणी सऱ्यांमध्ये मुरते त्यामुळे मूलस्थानी जलसंवर्धन होऊन पिकास तसेच पुढील हंगामातील पिकास लाभ होतो.विशेष पावसाचा दीर्घकालीन खंड पडल्यास लाभ होतो. अधिक पावसाच्या स्थितीत रुंद वरंबे सरी सोबतच्या दोन्ही बाजूकडील सऱ्यांमध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. गादी वाफे किंवा वरंब्या मध्ये हवा खेळती राहून पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. परिणामी आणखी बियाण्याची उगवण चांगली होते. खत व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय खत पाच टन किंवा कंपोस्ट खत शेवटच्या पाळीपूर्वी जमिनीत चांगले मिसळावे. रासायनिक खतांमध्ये हेक्टरी 30 किलो नत्र किलो स्फुरद व 30 किलो पालाश द्यावे. याविषयी डॉ.विजय सिडाम यांनी सखोल मार्गदर्शन केले. या प्रात्यक्षिका करिता निविष्ठा मध्ये सोयाबीन पिकाचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून प्रसारित झालेली पी.डी. के.वी .पूर्वा या वानाचे बियाणे वाटप करण्यात आले. कु. पल्लवी.एस गोडबोले, यांनी शासनाच्या विविध योजना विषय मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री डी. पी. डाखोरे, यांनी केले सदर निविष्ठा वाटप आणि शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन डॉ. व्ही. जी. नागदेवते, कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र शिंदेवाडी केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्याकरिता श्री डी. पी. डाखोरे, श्री. बी एस चव्हाण, कृषी सहाय्यक, श्री. के. एस. कांबळे आणि कैलास कामडी यांनी मोलाचे सहकार्य केले.