जलजन्य आजार : हिवतापाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना
चंद्रपूर, दि.24 जून : सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. या कालावधीत अनेक जलजन्य आजारांची उत्पत्ती होते. त्यामुळे आपला आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, रोगांचा प्रसार होणार नाही, याची काळजी घेणे आदी बाबींबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशाच जलजन्य आजारांपैकी हिवताप हा एक प्रमुख आजार आहे. याबाबत नागरिकांनी घ्यावयाची काळजी, याबाबत पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
हिवताप म्हणजे काय : हिवताप हा ‘प्लासमोडीअम’ या परोपजिवी जंतुमूळे होतो. हे जंतू चार प्रकारचे असतात. प्लासमोडीअम पॅुल्सीपॅरम या प्रकारच्या जंतुमूळे होणारा हिवताप घातक ठरू शकतो. विदर्भात गडचिरोली, गांदिया व चंद्रपूर जिल्हयात हया जंतुमूळे होणाऱ्या हिवतापाचे प्रमाण अधिक आढळते.
हिवतापाचा प्रसार कसा होतो : हिवतापाचा प्रसार ऑनाफिलीस या जातीच्या मादी द्वारे होतो. हिवतापाचे जंतू असलेल्या व्यक्तीस ऑनाफिलीस डासाची मादी चावल्यास हिवतापाचे जंतू डासाच्या शरीरात प्रवेश करतात. डासाच्या शरीरात हया जंतुची वाढ झाल्यानंतर (साधारण 3 ते 5 दिवस) ही डासाची मादी दुसऱ्या निरोगी व्यक्तीला चावल्यास तिच्या शरीरातील हिवतापाचे जंतू त्या व्यक्तीच्या रक्तात प्रवेश करतात व रक्तातून यकृतात जातात. तेथे त्यांची वाढ होते. त्यापैकी काही जंतू त्या व्यक्तीच्या रक्तातील तांबडया पेशीत प्रवेश करतात व तेथे त्यांची वाढ होऊन 48 तासात तांबडया पेशी फुटतात. ज्यावेळी तांबडया पेशी फुटतात त्यावेळी थंडी वाजून ताप येतो. म्हणून हिवतापामध्ये एक दिवसाआड थंडी वाजून ताप येत असतो.
हिवतापाची लक्षणे : एक दिवसाआड थंडी वाजून ताप येणे, डोके दुखी, अंग दुखी, मळमळ इत्यादी. यावर वेळेत उपचार न केल्यास तीव्र रक्तक्षय, कावीळ, मूत्रपिंड निकामी होते व मेदुंचा हिवताप होऊन रुग्णांचा मृत्यु संभवतो.
हिवतापाचे निदान : हिवतापाचे निश्चित निदान करण्याकरीता रुग्णांच्या रक्ताचा एक थेंब काचपट्टीवर घेवून त्यावर रंग प्रक्रिया करून सुक्ष्मदर्शक यंत्राखाली निरिक्षण केल्यास हिवतापाचे निश्चित निदान करता येते. परंतु सुक्ष्मदर्शक यंत्राव्दारे तपासणी गावपातळीवर सगळीकडे उपलब्ध नसल्यामूळे रॅपिड डॉयग्नोस्टीक किटव्दारे गावपातळीवर आरोग्य कर्मचारी व आशाव्दारे सुध्दा हिवतापाचे निदान केले जाते.
हिवतापावर उपचार : जंतुच्या प्रकारानूसार (पी.व्ही / पी.एफ. नुसार) उपचार घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात प्लासमोडीअम व्हायव्हॅक्स व प्लासमोडीअम फॅल्सीपॅरम हया दोन प्रकारचे जंतू आढळून येतात. प्लासमोडियम व्हायव्हॅक्सकरीता क्लोरोक्वीन च्या गोळया तीन दिवस व प्रायमाक्वीनच्या गोळया 14 दिवस, (वयोमानानूसार योग्य प्रमाणात) तसेच प्लासमोडीअम फॅल्सीपॅरमकरीता ए.सी.टी अधिक प्रायामाक्वीन च्या गोळया वयोमानानुसार योग्य प्रमाणात घेणे आवश्यक आहे. अर्धवट उपचार घेणे घातक ठरू शकते.
हिवताप प्रतिबंधात्मक उपचार : हिवताप संवेदनशील भागात जातांना हिवताप प्रतिबंधात्मक उपचार म्हणून आरोग्य कर्मचाऱ्या कडून दिली जाणारी डॉक्सीसायक्लीनची मात्रा वयोमानानूसार योग्य प्रमाणात घ्यावे. व संवेदनशील भागातून परत आल्यानंतर रक्ताची तपासणी करुन घ्यावी.
ताप असल्यास काय करावे : कोणत्याही वयोगटातील व्यक्तीस ताप असल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन रक्ताची तपासणी करून घ्यावी. रक्तात हिवतापाचे जंतू आढळल्यास त्वरीत समूळ उपचार घ्यावा. तसेच हिवतापाच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचीसुध्दा रक्ताची तपासणी करून घ्यावी. गरोदर माता, लहान मुले व प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुगणांमध्ये हिवताप गंभीर स्वरूप धारण करू शकतो. म्हणून त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने समूळ उपचार घेणे गरजेचे आहे.
जनतेची जबाबदारी / सहभाग : हिवतापाचा प्रसार डासामूळे होत असल्यामूळे या आजारावर नियंत्रण मिळवण्याकरीता डास उत्पत्ती होऊ न देणे महत्वाचे आहे. ऑनाफिलीस डासाची मादी स्वच्छ साठलेल्या पाण्यात अंडी घालते व त्यापासून 5-7 दिवसात पूर्ण विकसीत डास तयार होतात. म्हणून पाणी साचू न देणे. प्लॅस्टीकचे कप, डब्बे, ग्लास व इतर भांड्यात पाणी साचल्यास तेथे डासाची पैदास होते. तसेच प्रत्येकानी घरातील व परिसरातील पाण्याचे टाके, हौद इत्यादी आठवड्यातून किमान एक वेळा पूर्ण रिकामे करून घेतले तर डास उत्पत्तीवर आळा बसेल व त्यामूळे हिवताप व इतर कीटकजन्य आजारावर सुद्धा नियंत्रण ठेवता येईल.
हिवताप नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजना : पाण्याचे साठे पूर्ण रिकामे करणे शक्य नसल्यास आठवडयातून एकदा टेमिफॉस हे अळीनाशक द्रावण टाकावे. त्यामुळे डासाच्या अळ्या मरतील. तसेच येणाऱ्या फवारणी पथकामार्फत संपूर्ण फवारणी करुन घ्यावी. साचलेल्या पाण्यात डासोत्पत्ती होऊ नये म्हणून गप्पी मासे पाण्यात टाकावे. गप्पी मासे डासाच्या अळया खातात त्यामूळे डासोत्पत्ती टाळता येते. गावातील नाल्यामध्ये अळीनाशक फवारणी करून घ्यावी. झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा. तसेच डास विरोधी साधनांचा (जसे ओडोमॉस, डास विरोधी अगरबत्ती, क्रिम,कॉईल इ.) वापर नियमित करावा. त्याचप्रमाणे पूर्ण अंग झाकेल, असे कपडे परीधान करावे. प्रत्येकाने आठवडयातून एकदा कोरडा दिवस पाळावा. परिसरातील नाल्या नेहमी वाहत्या ठेवाव्यात. पाणी साचलेली डबके वेळीच बुजवावे. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना डासअळी व गप्पी मासांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात यावे. त्याचप्रमाणे किटकजन्य आजाराबाबत माहिती, कोरडा दिवसाचे महत्व पटवून द्यावे.