औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचे काम प्रत्यक्ष भेट देऊन पाहणार काम गतीने पण दर्जेदार करा – मुख्यमंत्र्यांचे निर्देश
जलवाहिनी, जलकुंभ उभारणी आणि खोदकामास वेग
मुंबई दि १७: औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने करतांना कोणत्याही अडचणी येणार नाही याची दक्षता घ्या आणि कामाचा सर्वोत्कृष्ट दर्जा ठेवा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मी स्वत: प्रत्यक्ष भेट देऊन या कामाची पाहणी करणार आहे असेही ते म्हणाले. आज मुख्यमंत्र्यांनी संकल्प कक्षामार्फत करावयाच्या कामात समाविष्ट झालेल्या या योजनेचा विस्तृत आढावा घेतला. नव्या योजनेची वेळापत्रकानुसार कामे झालीच पाहिजेत हे परत एकदा सांगून मुख्यमंत्र्यांनी जुनी जलवाहिनी बदलण्यासाठीचा प्रस्ताव सुद्धा लगेच सादर करावा असे निर्देश दिले. पुढील आढावा बैठकीस कंत्राटदार कंपनीच्या मालकांनी किंवा कंपनीच्या वरिष्ठ प्रतिनिधीने उपस्थित राहावे असेही ते म्हणाले.
या बैठकीस उपस्थित पालकमंत्री सुभाष देसाई यांनी देखील कायमच्या प्रगतीचा नियमित आढावा घेत असल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, नगरविकास प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची उपस्थिती होती.
केंद्राकडून पाठपुरावा करून परवानगी आणा
जायकवाडी धरणातील उद्भव विहीर ( जॅकवेल ) घेण्यासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला प्रधान सचिव वने मार्फत प्रस्ताव सादर केला आहे, त्याला लवकरात लवकर मान्यता मिळाली पाहिजे. मी प्रसंगी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री यांच्याशीही बोलेल. पण ही परवानगी मिळूस्तोवर इतर कामे थांबू देऊ नका. जलकुंभ, पाईप्स कोटींग करणे त्याचबरोबर खोदकाम ही सर्व कामे दर्जेदार पद्धतीने झाली पाहिजेत, मी स्वत: ती कामे पाहणार आहे, असे स्पष्ट करतांना मुख्यमंत्री म्हणाले की, शहरात पाणी वितरणासाठीच्या आराखडयास देखील वेळच्यावेळी परवानगी पालिकेने दिली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत कामे खोळंबता कामा नये.
पाईप्सचा पुरवठा होण्यास सुरुवात
यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांनी माहिती देतांना सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिल्याप्रमाणे या कामास वेग देण्यात आला असून कंत्राटदाराने सर्व ८३.६२ किमी डीआय पाईप्स मागविले आहेत तसेच ७८० मी लांबीचे एमएस पाईप्स तयार करण्यात आले असून कोटींगचे काम सुरू आहे. जल शुद्धीकरण केंद्र आणि जलकुंभाच्या तराफे भिंतींची कामे वेगाने सुरू आहेत. १६० किमी साठी एचडीपीई पाईप्सचा पुरवठा करण्यात आला असून १३.०४ किमी डीआय पाईप्सचा पुरवठाही कंत्राटदारास करण्यात आला आहे.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले की, पाणीपुरवठा योजना काम प्राधान्याने पूर्ण करीत असून नियोजनबद्धरीतीने आराखडे तयार करून पुढे जात आहोत. नागरिकांना देखील विश्वासात घेत आहोत असेही ते म्हणाले.
शहराच्या सध्याच्या पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू असून जायकवडी उद्भवातून ६ दलली पाण्याची वाढ तर , हर्सुल धरणातून ६ दलली पाण्याची वाढ करण्यात आली आहे. जायकवडी उद्भवातून आणखी ३ दलली आणि हर्सुल धरणातून ३ दलली पाण्याची वाढ करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.