महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराचे वितरण जुलैमध्ये – मंत्री विजय वडेट्टीवार
पुढील वर्षापासून या पुरस्कारांसाठी प्रत्येक महसूली विभागातून दोन व्यक्ती व एक संस्थांची निवड
मुंबई, दि. १६ : वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व संघटनात्मक विकासासाठी कलात्मक, समाज प्रबोधन व साहित्य उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार, समाज संघटक, समाज सेवक व्यक्ती तसेच संस्थांना ‘महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार देण्यात येतो. गत सहा वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. पुढील वर्षांपासून सात महसूली विभागातून दोन व्यक्ती व एका संस्थेची निवड केली जाणार असल्याची माहिती, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
दि. ८ जून २०१६ रोजी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासंदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला होता. त्यानुसार २०१६ – १७, २०१७ – १८, २०१८ – १९, २०१९ – २०, २०२० -२१, २०२१- २२ या सहाही वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारांचे वितरण झाले नव्हते.
२०१६-१७ प्रा. मनोहर बाबाराव धोंडे आणि संस्था म्हणून शिवा आखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, औरंगाबाद, २०१७-१८ श्री. अभय मनोहर कल्लावार, नागपूर तर संस्था म्हणून वीरमठ संस्थान ता. अहमदपूर, जिल्हा लातूर, २०१८-१९ श्री. विठ्ठल ताकबिडे, नांदेड, २०१९ – २० श्री. उमाकांत गुरूनाथ शेटे पुणे, संस्था म्हणून महात्मा बसवेश्वर सेवाभावी संस्था, फुलकळस ता. पुर्णा, जिल्हा परभणी, २०२० -२१ श्री. रामलिंग बापूराव तत्तापूरे लातूर, संस्था म्हणून तीर्थक्षेत्र आदी मठ संस्थान धारेश्वर, पोस्ट दिवशी खुर्द, ता. पाटण, जिल्हा सातारा, २०२१-२२ डॉ. यशवंतराव बाबाराव सोनटक्के, नवी मुंबई, संस्था म्हणून सारथी प्रतिष्ठान, शिवकृपा बिल्डींग, बसवेश्वर नगर, नांदेड या पुरस्कार विजेत्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
संस्था व व्यक्तीची निवड प्रत्येक विभागातून केली जाणार असून संस्थेला ५१/- हजार रोख व व्यक्तीला २५/- हजार रूपये रोख रक्कम तसेच सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ पुरस्कार म्हणून दिले जातील.
पुरस्कार वितरणास या क्षेत्रात कार्य करणारे कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार, समाज संघटक व समाजसेवक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी केले आहे.