योग दिन आयोजनाबाबत जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली आढावा
चंद्रपूर, दि. 14 जून : संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर केला असून केंद्र सरकारने सुध्दा हा दिवस संपूर्ण भारतात साजरा करण्याचे ठरविले आहे. या दिवसाचे औचित्य साधून तसेच कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा घेतला.
जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा विभागातर्फे 21 जून रोजी सकाळी 7 वाजता जिल्हा स्टेडीयम येथील बॅडमिंटन कोर्ट सभागृहात योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाला लोकप्रतिनधी तसेच शासकीय अधिकारी – कर्मचा-यांसह एनएसएस आणि शहरातील विविध संघटनांच्या सदस्यांना आमंत्रित करावे. तसेच सर्वांनी योग्य नियोजन करून आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वांच्या सहकार्याने पार पाडावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.
बैठकीला महानगर पालिकेचे उपायुक्त विपीन पालिवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी गणेश चव्हाण, तालुका क्रीडा अधिकारी राजू वडते, न्यू इंडिया कॉन्व्हेंट स्कूलच्या शिक्षिका शुभांगी डोंगरवार, स्काऊट गाईडच्या दीपा मडावी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रणाली दहाटे यांच्यासह योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.