बालविवाह थांबविण्यास महिला व बाल विकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व पोलीस स्टेशन आष्टी यांना यश
गडचिरोली,दि.07: चामोर्शी तालुक्यात एक बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती महिला व बाल विकास कार्यालय आला मिळाली होती. लगेच जिल्हा बाल संरक्षण टीम गडचिरोली व पोलीस स्टेशन आष्टी यांनी सदर बालविवाह रोखण्याकरीता विवाहस्थळ गाठले व बालक 18 वर्षाखालील असल्याची खात्री करून, सर्व माहितीची शहानिशा झाल्यानंतर पोलीस स्टेशन आष्टी येथील गणेश पी.जंगले पोलीस उपनिरीक्षक यांचे उपस्थितीत वर पक्ष व वधू पक्ष यांना एकत्र बसवून बालविवाह बाबतचे दुष्परिणाम व कायद्या नुसार होणारी कार्यवाही याबाबत उपस्थित सर्वांना माहिती देण्यात आली. बालिकेचे 18 वर्ष होइपर्यंत विवाह करणार नाही असे हमी पत्र लिहून घेतले व बालिकेचे समुपदेशन करण्यात आले.
सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, पोलिस स्टेशन आष्टी येथील गणेश पी.जंगले पोलिस उपनिरीक्षक, सामाजिक कार्यकर्ता जयंत जथाडे, दिनेश बोरकुटे सामाजिक कार्यकर्ते, क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार, भारती जवादे चाईल्ड लाईन टीम मेंबर, सरपंच मालाताई मेश्राम, ग्रा.प. सदस्या शकुंतला नेवार, पोलीस पाटील सदाशिव नैताम, अंगणवाडी सेविका बैनाबाई मडावी यांनी बालविवाह थांबवले.
अशाप्रकारे जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथे व चाइल्ड लाईन टोल फ्री नंबर 1098 यावर संपर्क करावे असे आवाहन महिला व बालकल्याण विकास कार्यालयाकडून करण्यात आले आहे.