मनपातर्फे मान्सूनपूर्व नाले स्वच्छता अभियान
चंद्रपूर, ता. २३ मे : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नाले स्वच्छता अभियान जोमात राबवविण्यात येत असुन पावसाळा सुरू होण्याआधी सर्व नाल्यांची सफाई करून पावसाचे पाणी सुरळीत वाहण्यास मोकळे केले जात आहेत.
आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल व उपायुक्त अशोक गराटे सफाई मोहिमेवर लक्ष ठेवून असुन १४० सफाई कर्मचारी, ४ जेसीबी, २ पोकलेन, गाळ वाहतुकीसाठी ५ ट्रॅक्टरद्वारे स्वच्छता करण्यात येत आहे. वडगाव, हिंदुस्थान लालपेठ कॉलरी, एमईएल प्रभाग, बंगाली कॅम्प, एसपी कॉलेज नाला, कुंडी नाला, अंबे नाला, महसुल कॉलनी नाला कॅन्टीन चौक परिसर , मायनस कॉटर परिसर, इंदिरा नगर, भानापेठ प्रभाग, बस स्टॅण्ड पुल ते वरोरा नाका, कृष्णा नगर, बाजार वॉर्ड , यादव वस्ती परिसर त्यादी ठिकाणी नियमित नाली सफाई करण्यात येत आहे.
नाल्यांची रूंदी व खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरीता सुरळीत प्रवाह करण्यात येत आहे. याद्वारे वाहणाऱ्या पाण्याची क्षमता वाढेल आणि नाल्यांच्या काठावर असलेल्या वस्त्यांत पावसाळ्यात येणाऱ्या पूरापासून सुरक्षा प्रदान होईल. शहरातील मोठ्या नाल्यांची तसेच लहान नाल्यांची साफ सफाई सुरू असून, मनुष्यबळ व जेसीबीच्या मदतीने गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात येत आहे. तसेच नाल्याभोवती वाढलेली झाडेझुडपी व नाल्यातील दगड बाहेर काढून सांडपाण्याला वाट काढून दिली जात आहे.