स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर
महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानांतर्गत उपजिविका कार्यशाळा
चंद्रपूर, दि. 19 मे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत कृषी व पशुसंवर्धन विषयावर आधारित दोन दिवसीय उपजीविका कार्यशाळा पार पडली. दि. 12 व 13 मे 2022 रोजी पंचायत समिती सभागृह,चंद्रपूर येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष चंद्रपूरच्या वतीने आयोजित या कार्यशाळेला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, पशुधन विकास अधिकारी श्री. रामटेके, श्री वाळके, विस्तार अधिकारी श्री. उघडे, श्री. बावनकुळे, तालुका अभियान व्यवस्थापक शितल देरकर तसेच कृषीसखी, पशुसखी, समुदाय संसाधन व्यक्ती, समुदाय कृषी व्यवस्थापक, समुदाय पशु व्यवस्थापक उपस्थित होते.
सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये करावयाची कामे व ते परिपूर्ण करण्यासाठी कामाचे नियोजनाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. गट विकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी शाश्वत उपजीविका या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री. वाळके यांनी कृषी विभागाच्या विविध योजना, शेडनेट, फळबाग लागवड, नर्सरी बीजप्रक्रिया, उगवण क्षमता, माती परीक्षण, सेंद्रिय शेती आदी विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. विस्तार अधिकारी श्री. उघडे यांनी शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग, नवीन तंत्रज्ञान याबाबत माहिती दिली. या कार्यशाळेमध्ये उपस्थितांना सेंद्रिय शेती, सेंद्रिय पद्धतीने तयार केलेली खते विक्री केंद्र, पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना, पशुधन वाढ, पशुवर येणारे आजार व त्यावरील उपचारांबाबत माहिती देण्यात आली.
तालुका अभियान व्यवस्थापक शितल देरकर यांनी वर्षभर करावयाच्या कामाचे नियोजन एकत्रित खरेदी-विक्री याबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले.