ग्रामपंचायत प्रारूप प्रभाग रचनेवर आक्षेप व हरकतीची माहिती सादर करण्याचा कार्यक्रम घोषित
- 382 ग्रामपंचायतीमध्ये होणार प्रभाग सीमा निश्चिती
भंडारा, दि. 11 : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागाच्या सीमा निश्चित करण्यासाठी नव्याने कार्यक्रम प्राप्त झाला असून जिल्ह्यातील 382 ग्रामपंचायतीमध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी होणार आहे.
त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रामपंचायत निवडणूक महेश पाटील यांनी प्रभाग रचना टप्प्या बाबतचा कार्यक्रम प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवला आहे. त्यानुसार सर्व तहसीलदारांनी प्राप्त झालेल्या हरकती व सूचना व सुनावणी घेणे प्रलंबित आहे. अशा हरकती उपविभागीय अधिकाऱ्यांनी सुनावणी घेण्यासाठी 13 मे पर्यंत कार्यवाही करावयाची आहे. आलेल्या प्रत्येक हरकती व सूचनांवर सुनावणी नंतर अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करायची तारीख 19 मे अशी आहे. तर प्रभाग रचना अंतिम करणे कार्यक्रमांमध्ये उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचनेला अंतिम मान्यता देणे व स्वाक्षरी करण्यासाठी 24 मे पर्यंत सादर करावयाचे आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला व्यापक नमुना अ मध्ये प्रसिद्धी देण्यासाठी 27 मे 2022 अशी कालमर्यादा आहे. तरी या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागाच्या सीमा निश्चित करण्यासाठी नव्याने कार्यक्रम जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे व त्या पद्धतीने तहसीलदारांनी त्याची अंमलबजावणी करावी असे आदेश श्री. पाटील यांनी निर्गमित केले आहेत.