बाल पंचायतीच्या प्रत्यक्ष कामकाज प्रात्याक्षिकाचे सादरीकरण
Ø जि.प. शाळा सोनापुर, शिक्षण विभाग व मॅजिक बसचा स्तुत्य उपक्रम
चंद्रपुर, दि. 10 मे : गोंडपिपरी पंचायत समिती, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सोनापुर व मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये बालपंचायत स्थापन करण्यात आली. स्थापित बालपंचायतीच्या प्रत्यक्ष कामकाज प्रात्याक्षिकाचे सादरीकरण मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या उपस्थितीत जनपथ सभागृह येथे करण्यात आले.
बालपंचायतीमध्ये निवडून आलेले विद्यार्थी अर्थात मंत्री यांनी बालपंचायतीचे कामकाज अत्यंत चोख पध्दतीने पार पाडले. हे प्रात्याक्षिक बघुन डॉ. मिताली सेठी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. जिल्हा परिषद शाळा व मॅजिक बस यांच्याअंतर्गत असेच विकासात्मक उपक्रम सुरु ठेवावे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख, गोंडपिपरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी समाधान भसारकर, मुख्याध्यापक साजन मोटघरे, शिक्षक श्री. गायकवाड, मॅजिक बसचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे, तालुका समन्वयक हिराचंद रोहणकार, सचिन दळवी, सचिन पाल व सर्व गटशिक्षणाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हा परीषदेचा शिक्षण विभाग व मॅजिक बस इंडीया फाऊंडेशन अंतर्गत वर्ग 6 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाळांमध्ये स्केल कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य सत्र घेण्यात येते. या सत्राबरोबर नाविन्यपूर्ण उपक्रम देखील घेण्यात येतात. यात प्रामुख्याने प्रत्येक शाळेमध्ये बालपंचायत स्थापन करणे हा उपक्रम घेण्यात आला. लोकशाहीमध्ये प्रत्यक्ष निवडणुक पध्दतीने देश व राज्यात लोकप्रतिनिधी निवडून देण्यात येतात. त्याचपध्दतीने शालेय विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया व लोकप्रतिनिधीचे कामकाज समजावे यासाठी बालपंचायत स्थापन करण्यात आली आहे.
बालपंचायतीची निवडणूक प्रत्यक्ष मोबाईल ईव्हीएमच्या माध्यमातून पध्दतीने घेण्यात आली होती. चंद्रपुर जिल्ह्यातील पहिलाच अशा प्रकारचा नाविन्यपुर्ण उपक्रम प्रथमतः गोंडपिपरी तालुक्यातील शाळांमध्ये राबविण्यात आला आहे. आज तालुक्यातील अनेक शाळांमध्ये बालपंचायती स्थापन आहेत. या बालपंचायतीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व प्रत्येक खात्याचे मंत्री असतात. निवडून आलेल्या बालपंचायतची शाळा, विद्यार्थी व अभ्यासात्मक मुद्यांवर चर्चा करुन उपाय शोधत असतात.
गोंडपिपरी तालुक्यातील सोनापुर देशपांडे या गावात ग्रामपंचायतीपासून तर शाळा आदर्श आहेत. या गावात जिल्हा परिषदेची इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंत शाळा आहे. शाळेतील बालपंचायत सर्व शाळांसाठी आदर्श बनली आहे. शिक्षणाधिकारी (प्राथ.) दिपेंद्र लोखंडे यांनी सोनापुर देशपांडे येथे भेट देऊन बालपंचायतीच्या कामकाजाची पाहाणी केली. शाळेत बालपंचायत स्थापन व्हावी, यासाठी सोनापुर शाळेचे मुख्याध्यापक साजन मोटघरे, मॅजिक बसचे शाळा सहाय्यक अधिकारी सचिन दळवी, समन्वयक सचिन पाल तसेच शिक्षक वर्गांनी अथक प्रयत्न केले.
या प्रात्याक्षिकामध्ये नुपुर चौधरी, अक्षरा तुमडे, श्वेता खेकारे, पायल तिमाडे, प्रणाली खेकारे, रोहिणी सातपुते, संकेत कांबळे, राहुल कळांबे, योगेश चौधरी, क्रिश तुमडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बालपंचायत प्रात्याक्षिकाचे सादरीकरणाच्या सुरुवातीला मॅजिक बसचे सचिन दळवी यांनी प्रास्ताविक केले.