शेतक-यांच्या जमीन मोजणीची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा
– पालकमंत्री विजय वडेट्टीवार
Ø जमीन मोजणीकरीता रोव्हर मशीन खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देणार
Ø जूनपर्यंत सर्व प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना
चंद्रपूर दिनांक 6 मे : शेतकरी आपल्या जमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज करतात. शेतकऱ्यांची प्रकरणे भूमिअभिलेख कार्यालयाकडे तशीच पडून असतात. जमीन मोजणी संदर्भात तालुकास्तरावर अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांची तसेच वनपरिसरातील वनहक्क कायद्याबाबतची प्रलंबित मोजणी प्रकरणे वेळेत निकाली काढा, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी भुमी अभिलेख विभागाला दिल्या.
जिल्ह्यातील जमीन मोजणीच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा भूमी अधीक्षक श्री. घाडगे उपस्थित होते.
जमीन मोजणीकरीता रोव्हर मशिन खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देऊ असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, मोजणीची प्रलंबित प्रकरणे जूनपर्यंत निकाली काढा. ज्या शेतकऱ्यांचे अर्ज सुरवातीला आले त्यांना प्राधान्याने जमिनीची मोजणी करून द्या. मोजणीच्या तक्रारी ह्या गंभीर आहेत. जमिनीची मोजणी करण्यासाठी पैसे भरूनही प्रतिक्षा करावी लागते. पांदण रस्त्यांची मोजणी प्राथमिकतेने करावी. जिथे तक्रार आली ते प्रकरण त्वरित निकाली काढावे. हद्द कायमचे प्रकरण अनेक वर्षापासून प्रलंबित असतात त्यामुळे कालमर्यादा ठरवून असे प्रकरण त्वरीत निकाली काढावे.
मोजणीकरीता रोव्हर हे जीपीएस बेस टेक्नॉलॉजीने परिपूर्ण असल्याने रोव्हर मशीनमुळे एका दिवसात पाच ते सहा ठिकाणची मोजणी पूर्ण होते. तातडीची मोजणी तीन महिने, साधारण सहा महिने तर अति तातडीची मोजणी दोन महिन्यात पूर्ण केली जाते. रोव्हर उपलब्ध झाल्यास सर्व प्रकरणांचा त्वरीत निपटाला करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा भूमी अधीक्षक श्री. घाडगे यांनी यावेळी दिली.