संपर्क तुटणाऱ्या गावांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी भेटी देऊन अहवाल सादर करावा
- बोटी,टॉर्चसह अन्य बचाव साहित्याची तपासणी करावी – जिल्हाधिकारी
भंडारा दि.5 :आगामी पावसाळयात आपत्ती नियंत्रणासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी संपर्क तुटणाऱ्या 18 गावांना प्रत्यक्ष भेट दयावी तसेच गावकऱ्यांशी बैठक घेवून चर्चा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष संदीप कदम यांनी आज दिले.
जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक ते बोलत होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री.नामदास यांनी सादरीकरण केले.पुरप्रवण गावांची यादी तयार करून नैसर्गीक आपत्तीत गावकऱ्यांना पर्यायी निवास व्यवस्थेसाठी शाळा,समाजमंदीरे,इमारतीची पाहणी करावी.तेथे वीज,पाणी व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
पावसाळयात आरोग्य विभागाने साथ प्रतिबंधक औषधासह सर्पदंशावरील औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. पुर परिस्थीती उदभवल्यास डिझेल जनरेटरची पर्यायी व्यवस्था करावी. सर्व विभागांनी नोडल अधिकारी नियुक्त करावे व त्यांची यादी श्री.नामदास यांच्याकडे दयावी.
सर्व नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी नालेसफाईची कामे तातडीने सुरू करावीत.पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची पावसाळयापूर्वी साफसफाई करण्यात यावी.धोकादायक पुलावर रेडीअमचे सुचनाफलक लावावेत. जिल्ह्यात 154 गावे नदी काठावर आहे. या गावांसाठी पर्यायी मार्गांची यादी तयार करावी. मान्सून तसेच आपत्तीच्या वेळेस कार्य प्रणालीची कार्यपद्धती अद्ययावत करावी, असे त्यांनी सांगितले.
धरणाचे पाणी सोडतांना गावकऱ्यांना पूर्व सूचना देण्यात यावी. त्यासाठी दवंडी, सोशल मिडिया आदीचा वापर करण्यात यावा असे त्यांनी सांगितले. आपल्या कार्यक्षेत्रात सुरक्षीत निवारा, समाजभवन, शाळा, मंगल कार्यालय, लॉन, मोठ्या इमारती इत्यादींची ओळख करून त्या आरक्षीत करण्याबाबत कार्यवाही आताच करावी.
मंडळ अधिकाऱ्यांनी पर्जन्यमापक यंत्रणांची तपासणी करावी व अहवाल दयावा. प्रशिक्षीत होम गार्डना आपत्तीच्या वेळी मदतकार्यासाठी पाचारण करावे. असे पोलीस अधिक्षक वसंत जाधव यांनी सांगितले.
सर्व यंत्रणांनी पूरपरिस्थिती व आपत्तीच्या काळात समन्वय ठेवून काम करावे तसेच दिलेल्या जबाबदारीचे गांभीर्याने पालन करावे असे श्री.कदम यांनी निर्देशीत केले. यावेळी पोलीस अधीक्षक वसंत जाधव,मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन,सहायक जिल्हाधिकारी बी.वैष्णवी यासह निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील व अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यासह सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.