कृषी विभागाची गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन मोहीम
चंद्रपूर दि. 26 एप्रिल : सन 2021-22 मध्ये लांबलेल्या पावसामुळे अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी कापूस पीक जानेवारीच्या पुढेही शेतात तसेच ठेवलेले होते. वाढीव पावसामुळे लांबलेला कापूस हंगाम यामुळे कापूस पीक शेतात तसेच राहिल्याने किडीस नियमित खाद्य पुरवठा होऊन किडीचा जीवनक्रम अखंडीत पुढे चालू राहण्याची शक्यता आहे. परिणामत: पुढील हंगामात या किडीचा पुन्हा मोठा प्रादुर्भाव होवू शकतो. त्यामुळे सतर्कतेच्या दृष्टीने या बाबींकडे दुर्लक्ष न करता आगामी कापूस हंगाम सुरू होण्यापूर्वीपासूनच शेतकऱ्यांनी जागृत राहणे व त्यादृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
या कराव्यात उपाययोजना:
शेवटच्या वेचनी नंतर शेतातील पऱ्हाटयांचे श्रेडर, रोटाव्हेटर सारख्या यंत्राद्वारे लहान-लहान तुकडे करून शेतात गाडावे किंवा त्यांचा वापर शेताबाहेर कंपोस्ट तयार करण्यासाठी करावा. उन्हाळ्यामध्ये (एप्रिल-मे महिण्यात) जमिनीची खोल नांगरणी करावी. कापूस पिकाची पूर्वहंगामी (मे मधील) लागवड टाळावी. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध संकरीत वाणांची लागवड न करता गावनिहाय एकाच वाणाची व एकाचवेळी लागवड करावी. शिफारस केलेल्या कमी कालावधीत पक्व होणाऱ्या बीटी कापूस अथवा सरळ वाणांची वेळेतच म्हणजे जून महिन्यात जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतर पेरणी करावी. किडीच्या जीवनक्रमात अडथळा निर्माण करण्यासाठी पिकांची फेरपालट करावी. कपाशीच्या सभोवती नॉन बीटी (रेफ्युजी) कपाशीची लागवड करावी. नत्र खताचा वापर जास्त झाल्यास पिकाची कायिक वाढ होऊन गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणून जास्तीच्या नत्र खताचा वापर न करता मृद परीक्षण करून त्याच्या आधारावर खतांच्या मात्रेचा अवलंब करावा.
याप्रमाणे आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.