येत्या शनिवारी महा-पशु लसीकरण अभियान
भंडारा, दि. 27 : जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त येत्या शनिवारी (30 एप्रिल) महा-पशु लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात कुत्र्यांना ॲण्टी रेबीज लसीकरण, कोबड्यांना राणीखेत व कोंबड्यांची देवी व गायी म्हशी व शेळ्यांना घटसर्प, एकटांग्या आंत्रविषार या आजारापासून मुक्त ठेवण्यासाठी लसीकरण करण्यात येणार आहे. जनावरे रोग मुक्त राहिल्यास पशु उत्पादने देखील आरोग्यदायी व गुणवत्तापुर्ण राहतील. स्वच्छ दुध, मांस व अंडी उत्पादनातुन निरोगी मानवी आरोग्याला मदत होईल. पशुवैद्यकीय व्यवस्थांचे बळकटीकरण व त्यातून स्वस्थ पशु व स्वस्थ मनुष्य ही संकल्पना साध्य करता येईल.
पशुसंवर्धन खाते, नॅशनल असोसिशिएन फॉर ॲनितल्स ॲण्ड रिसर्च व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व पशुपालकांनी त्यांच्या पशु व प्राण्यांना पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात सकाळी 8 ते दुपारी 1 च्या दरम्यान घेऊन येण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. एस. वंजारी यांनी केले आहे.