पंचायत समिती सभापती आरक्षण जाहीर
भंडारा, दि. 22 : जिल्ह्यातील सात पंचायत समिती सभापती पदासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामध्ये भंडारा, लाखनी व पवनी हे सर्वसाधारण महिला साठी आरक्षित तर लाखांदूर अनुसूचित जमाती महिला व मोहाडी अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. तुमसर व साकोली सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले.
जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उपमुख्यकार्यकारी (पंचायत) किरण कोवे व विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ही सोडत प्रणव रामटेके या बालकाने ईश्वर चिठ्ठीद्वारे काढली. निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांनी यावेळी आरक्षणाबाबतची संपूर्ण प्रक्रिया उपस्थितांना समजावून सांगितली तसेच उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची प्रश्नांचे समाधान देखील त्यांनी यावेळी केले.