शहराच्या तापमानात वाढ
मनपाने घेतली उष्माघात कृती आराखडा समन्वय समितीची बैठक
चंद्रपूर : शहराच्या तापमानात वाढ झाली असून, पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. अशावेळी उष्माघाताने मृत्यू होऊ नये, यासाठी जागरूक राहणे गरजेचे आहे. यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून उष्माघात कृती आराखडा
(हिट ॲक्शन प्लॅन) समन्वय समितीची बैठक आज मंगळवार दिनांक 5 एप्रिल रोजी घेण्यात आली.
मनपाच्या स्थायी समिती सभागृहात पार पडलेल्या बैठकीत उपायुक्त तथा मुख्य लेखा अधिकारी संतोष कंदेवार, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, आय एम ए चे अध्यक्ष डॉ. अमल पोद्दार, सचिव नगिना नायडू, महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता सू. म. पडोळे, मनपाचे नगर रचनाकार मांडवगडे, स्वच्छता विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आरोग्य पर्यवेक्षक आर. व्ही. खांडरे, मनपाचे शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. नरेंद्र जनबंधू, ऑटोरिक्षा असोसिएशनचे हरिदास नागपुरे, चिल्ड वॉटर असोसिएशनचे महेश बुटले यांच्यासह मनपाच्या सर्व सातही शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये 2016, 2017, 2018 आणि 2019 मध्ये हिट ॲक्शन प्लॅन अर्थात उष्माघात कृती आराखडा राबविण्यात आला. यंदा 2022 उन्हाळ्यात देखील मध्ये चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून उष्माघात कृती आराखडा राबविण्यात येणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात वाढत्या तापमानाची झळ ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात जास्त जाणवते. गेल्या काही वर्षात चंद्रपूर शहराची देशातील सर्वात उष्ण शहर म्हणून देखील नोंद करण्यात आलेली आहे.
उष्माघात कृती आराखड्याच्या माध्यमातून मनपाच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या अधिनस्त असलेल्या आरोग्य कर्मचारी आणि आशा कार्यकर्त्यांना देखील प्रशिक्षण देण्यात येईल. उष्माघातापासून बचाव कसा करावा, या संदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टीने नागरिकांपर्यंत हॅन्डबिल, पोस्टर बॅनर आणि होल्डिंग च्या माध्यमातून देखील माहिती पोहोचण्यात येणार आहे. उष्माघात प्रतिबंधक उपाय योजनांची माहिती जास्तीत जास्त नागरिकांना व्हावी, यासाठी सिनेमागृह, बसस्थानक आणि रेल्वे स्टेशन येथेही घोषणापत्र लावण्यात येणार आहेत. एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांमध्ये उष्माघात रुग्णांसाठी शीत कक्ष (कोल्ड वॉर्ड) कार्यान्वित करण्यात येणार असून, एक मोबाईल टीम देखील कार्यान्वित ठेवण्यात येणार आहे.
चंद्रपूर शहरात सध्या महाकाली यात्रेला प्रारंभ झाला असून, येथे येणाऱ्या भाविकांचे उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी आणि आरोग्य सेवा देण्यासाठी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चैत्र महिन्यात सुरू असलेल्या महाकाली देवी यात्रेतील भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी, सावली देणारे पेंडॉल, कुलर लावण्यात यावे, अशी सूचना महानगरपालिकेच्या माध्यमातून महाकाली मंदिर ट्रस्ट यांना देण्यात आली आहे.
वाटसरूंना थंड पाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी देखील स्वयंसेवी संस्थांना आवाहन करण्यात आलेले आहे. स्वयंसेवी संस्थांनी पेंडॉल, मोठे रांजण आणि मठांची व्यवस्था केल्यास पिण्याच्या पाण्याची व्यवस्था महानगरपालिकेच्या माध्यमातून केली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
दुपारच्या सुमारास बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना सावली आणि विश्रांती घेण्यासाठी सर्व बगीचे व उद्याने दिवसभर सुरू ठेवावीत, असेही सूचित करण्यात आले. याशिवाय वन कामगार व मजुरांच्या कामाच्या वेळेत बदल करून पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था करावी, अशी सूचना विभागीय वन अधिकारी यांना देण्यात आली. बांधकाम मजुरांना दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत उन्हात काम करण्याच्या दृष्टीने देखील वेळेत बदल करावेत, अशी सूचनाही देण्यात आली आहे.