खान पट्ट्यात काम करणा-या मजुरांच्या
आरोग्यासंदर्भात जागरूकता कार्यक्रम
चंद्रपूर, दि. 15 मार्च : श्रम एवं रोजगार मंत्रालय, खान सुरक्षा महानिदेशालय, नागपूर क्षेत्र व जिल्हाधिकारी कार्यालय (खनिकर्म शाखा) चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्ह्यात कार्यरत खाणपट्टाधारक तसेच त्या ठिकाणी कामावर असलेल्या मजुरांच्या आरोग्यसंदर्भात ‘सिलिकोसीस जागरुकता कार्यक्रम’ घेण्यात आला.
नियोजन सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खान सुरक्षा महानिदेशालय चे संचालक सागेश कुमार, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम, उपसंचालक श्री. गुप्ता उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, सर्व कामगारांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये स्वत:च्या व सहका-याच्या आरोग्यांशी निगडीत बाबींकरीता दक्ष रहावे. सुरक्षा व आरोग्य ही बाब अत्यंत महत्वाची असून याबाबत काळजी घ्यावी तसेच चर्चा करावी. अपाय होणारे स्रोत लगेच ओळखून याबाबत कंपनी प्रशासन व खाण मालकाला वेळीच सावध करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. सागेश कुमार यांनी, आपले कार्यस्थळ आरोग्यपूर्ण व दोषरहीत कसे असावे, याबाबत मार्गदर्शन केले. तर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सिलोकोसीस आजाराबाबत माहिती देऊन कंपनी प्रशासनाने प्रत्यक्ष खाणक्षेत्रामध्ये दरवर्षी आरोग्य शिबिर आयोजित केल्यास उत्तम राहील, असे मत व्यक्त केले.
खाणीमध्ये काम करीत असतांना कोळसा वगळता इतर सर्व प्रकारच्या खनिजांमध्ये सिलिका हा धातु कमी अधिक प्रमाणात असतो. या धातुचा समावेश धुळीत/वायुत होऊन त्याव्दारे हा रोग मानवाच्या शरीरात होतो व हा आजार जडतो. सिलीकोसीस आजाराच्या लक्षणामध्ये थकवा, श्वास घेण्यास त्रास, जेवण न होणे, छातीत दुखणे याबाबत माहिती देण्यात आली. तसेच सिलीकोसोस आजार होऊ नये याकरीता खान परीसरात काम करणारे मजुर, कामगार यांनी तोंडाला मास्क लावणे, खान परिसरात पाण्याची फवारणी करणे, ब्लास्टींग वा धुळ असतांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे, या बाबी कटाक्षाने पाळण्याच्या सुचना देण्यात आल्या.
मान्यवरांचे आभार जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांनी मानले. कार्यक्रमाला अल्ट्राटेक सिमेंट, डालमिया, अंबुजा, माणिकगड सिमेंटचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह जिल्ह्यातील खाणपट्टा धारक व तेथील कामगार उपस्थित होते.