व्यवसाय कराच्या विवरणपत्रकावरील विलंब शुल्क माफ
- व्यावसायिकांना मोठा दिलासा
- अधिकाधिक व्यापाऱ्यांनी संधीचा लाभ घ्यावा : व्यवसाय कर अधिकाऱ्याचे आवाहन
भंडारा, दि. 15 : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे अनेक क्षेत्रात व्यावसायिकांचे नुकसान झाले. हे लक्षात घेऊन शासनाने व्यवसाय कराच्या विवरणपत्रावरील विलंब शुल्क माफ करून व्यापारी बांधवांना मोठा दिलासा दिलेला आहे. या संधीचा लाभ जास्तीत जास्त व्यावसायिकांनी घ्यावा, असे आवाहन व्यवसाय अधिकारी, भंडारा यांनी केले आहे.
व्यवसाय कर कायदा १९७५ अन्वये शासनाने दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ रोजी अधिसूचना जारी करून व्यवसाय कर कायद्याअंतर्गत भरावे लागणारे मासिक आणि वार्षिक विवरणपत्रावरील विलंब शुल्क माफ केले आहे. विवरणपत्र हे नियमित कालावधीमध्ये भरणे आवश्यक असते. अन्यथा ३० दिवसापर्यंतच्या विलंबासाठी २०० रुपये व त्यानंतरच्या प्रत्येक विलंबासाठी १००० रुपये इतके विलंब शुल्क आकारले जाते. परंतु अनेक व्यावसायिक कोरोनाच्या संकटामुळे विवरणपत्र भरणा करू शकले नाही. त्यांनी शुल्क माफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन भंडारा जिल्हा व्यवसाय कर अधिकारी शैलजा शेंडे यांनी केले.
डिसेंबर २०२१ पर्यंतच्या कोणत्याही कालावधीचे देय व्यवसाय कर व व्याजाचा भरणा करून विवरणपत्रके ३१ मार्च २०२२ पर्यंत दाखल केल्यास विलंब शुल्क माफी लागू राहील. सर्व आस्थापना, व्यापारी, व्यावसायिक यांनी या संधीचा लाभ घेऊन प्रलंबित विवरणपत्र लवकरात लवकर दाखल करावीत, असे आवाहन व्यवसाय कर विभाग, वस्तू व सेवा कर कार्यालय, भंडारा यांनी केले आहे.