वन्यप्राण्यांचा धोका लक्षात घेता बेघर व्यक्तींनी मनपाच्या निवारा केंद्राचा आधार घ्यावा
चंद्रपूर | शहरातील नागपूर मार्गावर असलेल्या लक्ष्मीनगर, वडगाव आणि आंबेडकर नगर भागामध्ये अस्वल फिरत असल्याचे नुकतेच उघड झाले असून, या भागामध्ये दहशतीचे वातावरण आहे. अशावेळी कोणत्याही बेघर व्यक्तीनी रस्त्यावर उघड्यावर रात्रीच्या वेळेस झोपू नये, त्यांनी मनपाच्या शहरी बेघर निवारा केंद्राचा आधार घ्यावा, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत शहरी बेघर निवारा केंद्र चालविण्यात येतो. येथे शहरी बेघर लोकांना राहण्याची सोय आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर शहरामध्ये नागरी वस्त्यांमध्ये वन्यप्राण्यांचे आगमन वाढलेले आहे. मनपाच्या माधमातून पोलिसांच्या सहकार्याने बेघर व्यक्तींना हलविण्यात येत आहे. त्यासाठी विशेष वाहन व्यवस्था करण्यात आली आहे.
लक्ष्मीनगर परिसरात मध्ये विद्यानिकेतन शाळेजवळ अस्वल फिरल्याचे उघड झाले. याच भागात रस्त्यांच्या दुतर्फा टेडी बिअर विकणारे लोक उघड्यावर राहतात. अशावेळी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा नागरिकांनी देखील सुरक्षेचा कारणास्तव मनपाच्या शहरी बेघर निवारा केंद्रात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी असुरक्षितता वाटल्यास निवारा केंद्रात खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
प्रीतम बिरे
+91 97667 76962
गोपाल गायधने
+91 98224 50024