युक्रेनमधून चंद्रपूरचे सहा विद्यार्थी स्वगृही
Ø चार दिल्लीत दाखल, एक हंगेरीत तर दुसरा रोमानियाच्या मार्गावर
चंद्रपूर दि. 3 मार्च : सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील 12 विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थी सुखरुप स्वगृही परतले आहेत. तर चार विद्यार्थी दिल्ली येथे पोहचले असून उर्वरीत दोन विद्यार्थी येण्याच्या मार्गावर आहे. यापैकी एक जण हंगेरी या देशाच्या सीमेवर असून दुसरा विद्यार्थी रोमानिया या देशाच्या मार्गावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
चंद्रपूर जिल्ह्यात पोहचलेल्या विद्यार्थ्यांमध्ये हर्षल बलवंत ठावरे (चिमूर), आदिती अनंत सायरे (वरोरा), साहिल संतोष भोयर (बल्लारपूर), खुशाल बिपूल बिस्वास (चंद्रपूर), शेख अलिशा करीम (राजुरा) आणि गुंजन प्रदीप लोणकर (चिमूर) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. चिमुरची ऐश्वर्या प्रफुल खोब्रागडे, चंद्रपूर येथील धीरज असीम विश्वास आणि महेश भोयर तर ब्रम्हपूरी येथील महक उके दिल्ली येथे पोहचले आहेत. तर भद्रावती येथील नेहा शेख ही हंगेरीच्या सीमेवर असून चंद्रपूरचा दीक्षाराज अकेला हा रोमानिया देशाच्या सीमेकडे वाटचाल करीत असल्याची माहिती संबंधितांच्या नातेवाईकांनी प्रशासनाला दिली.
युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी त्वरीत जवळच्या तहसील कार्यालयात किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयातील 07172-251597 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 7666641447 या मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.