अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव 15 एप्रिलपर्यंत सादर करावे
चंद्रपूर, दि. 17 फेब्रुवारी : सत्र 2022-23 मध्ये एमएचटी- सीईटी, नीट, जेईई, एमबीए, बी.एड व एलएलबी आदी प्रकारच्या सीईटी देऊन व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांची प्रवेश फॉर्म भरण्याची सीईटी ची तारीख वाढलेली असून ज्या विदयार्थ्यांनी प्रवेश परीक्षेमध्ये मागासवर्ग सवलतीचा दावा केला आहे. व मागासवर्ग सवलतीचा लाभ घेण्यास इच्छुक आहेत. अशा अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचा ऑनलाइन पद्धतीने भरलेला अर्ज दि. 15 एप्रिल 2022 पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.
अर्जदारांनी ऑनलाइन सादर केलेल्या प्रस्तावाची छायांकित प्रत, सीईटी प्रत, मूळ शपथपत्रे, फॉर्म नंबर 3 व 17 तसेच जातीदावा सिद्ध करणारे जातीचे व अधिवासाचे मानीव दिनांकापूर्वीचे (अनुसूचित जातीकरिता सन 1950 पूर्वीचे, विमुक्त जाती व भटक्या जमातीकरिता 21 नोव्हेंबर 1961 पूर्वीचे, व इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गाकरिता 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीचे) महसुली आणि शैक्षणिक दस्तऐवजांच्या छायांकित प्रती कार्यालयात सादर करून ऑनलाईन भरणा केलेल्या पावतीची पोहोच घ्यावी.
तरी, एमएचटी- सीईटी, नीट, जेईई, एमबीए, बी.एड व एलएलबी आदी प्रकारच्या सीईटीसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांनी दि. 15 एप्रिल 2022 च्या आत जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर करावा जेणेकरुन सत्र 2022-23 मध्ये प्रवेशाकरीता जात वैधता प्रमाणपत्राअभावी कोणताही मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहणार नाही. जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळेपुर्वी अर्ज सादर न केल्याने प्रवेशावेळी जात वैधता प्रमाणपत्रा अभावी अर्जदार प्रवेशापासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराची राहील, याची नोंद घ्यावी. असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून कळविण्यात आले आहे.