सिंदेवाही येथे गोसीखुर्दचा उपविभाग सुरू करणार
-पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार
Ø 10 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन
चंद्रपूर, दि. 20 फेब्रुवारी : ब्रम्हपुरीसह या क्षेत्रातील सिंदेवाही, सावली हे धान उत्पादक तालुके आहेत. या भागात सिंचनाची जास्तीत जास्त सोय उपलब्ध करून देणे, हे आपले प्राधान्य आहे. नागभीड़ मध्ये बोगदा काढून सिंचनासाठी पाणी आणले जात आहे. मे महिन्याअखेर पर्यंत हे काम पूर्ण होणार असून सिंदेवाही येथे गोसीखुर्दचा उपविभागीय सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहो, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी केले.
रविवारी सिंदेवाही येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी – कर्मचारी निवासी इमारत बांधकामाचे भूमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी कार्यकारी अभियंता हेमंत कोठारी, नगर पंचायतीचे अध्यक्ष स्वप्नील कावड़े, उपाध्यक्ष मयूर सूचक, जि. प. सदस्य रमाकांत लोधे, रूपा सुरपाम, बाबुराव गेडाम, सुनील उत्तलवार, अरुण कोलते, नलिनी चौधरी आदी उपस्थित होते.
गोसीखुर्दच्या पाण्यामुळे उमा नदीच्या पलिकडचा सर्व भाग सिंचनाखाली येणार, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, सिंचनाच्या कामाचे 12 कोटीचे कंत्राट मंजूर झाले आहे. परिसरातील कोणतेही गाव सिंचनापासून वंचित राहणार नाही. वाकल येथे निर्माणाधीन असलेल्या पुलाच्या बाजूला बंधारा बांधण्यात येईल, जेणेकरून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ होईल.
पुढे पालकमंत्री म्हणाले, सिंदेवाही येथे साडेआठ कोटी खर्च करून सा. बा. विभागाच्या अधिकारी कर्मचा-यांसाठी निवासी इमारत तसेच तहसील कार्यालय परिसरातसुद्धा नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. शहरातील शिवाजी चौकपासून 33 कोटींच्या सिमेंट रस्त्याचे काम, महाराजांचा पुतळा आणि चौकाचे सौंदर्यीकरणसाठी 75 लक्ष रुपये मंजूर आहे. तसेच शिवाजी चौक ते हिरापुर बोथली रस्त्यासाठी या अर्थसंकल्पात निधी मंजूर केला जाईल.
येथील औद्योगिक वसाहतीत अगरबत्ती निर्मितीच्या 100 यूनिट मधून जवळपास एक हजार महिलांना रोजगार उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात परिसरातील गावांना सिमेंट रस्ते, पेवर ब्लॉक आदीसाठी 30-30 लक्ष रुपये दिले जातील. तर उर्वरित गावांना दुसऱ्या टप्प्यात निधी दिला जाईल. सिंदेवाही तालुक्यात यावर्षी 12 कोटींचे 40 किमीचे पांदन रस्ते मंजूर आहेत. तहसील कार्यालयासमोरच्या उड़ान पुलासाठी 90 कोटींचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांपासून तर सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी आपण नेहमी कटिबद्ध आहोत. आपण कोणती विकासकामे केली, हे लोकांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवले पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी लोकांच्या घरापर्यंत जावून विकास कामे पोहचवावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पालकमंत्र्यांनी तालुक्यात 10 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. यात सिंदेवाही येथे सा.बा. विभागाची निवासी इमारत बांधकाम (8 कोटी 33 लक्ष), पळसगाव (जाट) येथे बौध्द विहाराची संरक्षण भिंत व सौंदर्यीकरण (35 लक्ष), चिखल व मिनघरी येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम (25 लक्ष व 20 लक्ष), उमरवाही येथे आदिवासी मोहल्ल्यात समाज मंदिराचे बांधकाम (25 लक्ष), रत्नापूर येथे वाचनालयाचे बांधकाम (20 लक्ष) आणि पेंढरी येथे सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचा (30लक्ष) समावेश आहे. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवार या दोन दिवसात पालकमंत्र्यांच्या हस्ते ब्रम्हपुरी आणि सिंदेवाही तालुक्यात अनुक्रमे 31 कोटी आणि 10 कोटी अशा एकूण 41 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.