गृह विलगीकरणातील रुग्णांवर लक्ष ठेवा – जिल्हाधिकारी गुल्हाने
Ø जिल्हास्तरीय टास्क फोर्सचा आढावा
चंद्रपूर, दि. 17 जानेवारी : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर कोरोनाच्या संसर्गाने अचानक उसळी घेतली असून जिल्ह्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बहुतांश नागरिकांना सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यापासून इतरांना प्रादुर्भाव होणार नाही व गृह विलगीकरणातील नागरिक घरातच राहावे, यासाठी यंत्रणेने त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवावे, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टास्क फोर्सच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, डॉ. मिलिंद सोमकुंवर, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. गर्गेलवार आदी उपस्थित होते.
गृहविलगीकरणातील नागरिक बहुतांश वेळी घराबाहेर फिरत असल्याचे निदर्शनास येते, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई करा. तसेच गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांना रोज फोन करून त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती घेणे आवश्यक आहे. अद्यापही जिल्ह्यात दुसरा डोज घेणा-यांची गती संथ आहे. कालावधी होऊनही दुसरा डोज न घेणा-यांपर्यंत यंत्रणेने पोहचावे. आपल्या कार्यक्षेत्रात ज्या दिवशी लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले आहे, त्याची माहिती ग्रामस्तरीय यत्रंणेमार्फत नागरिकांपर्यंत पोहचली पाहिजे. त्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी दोन दिवसांपूर्वी प्रत्यक्ष किंवा व्हीसीद्वारे बैठकीचे नियोजन करावे. अशा बैठकीला शासकीय यंत्रणेचे अधिकारी – कर्मचारी उपस्थित राहत नसेल तर त्यांना नोटीस द्या.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, सद्यस्थितीत रुग्ण वाढत असले तरी सीसीसी आणि डीसीएच मध्ये अल्प प्रमाणात रुग्ण भरती आहेत. मात्र असे असले तरी भविष्यात अडचण होऊ नये म्हणून आपापल्या कार्यक्षेत्रात सीसीसी कुठे सुरू करता येईल, त्याचे नियोजन करा. कोव्हीड प्रतिबंधात्मक वर्तणूकीसाठी टीमचे गठन करा. अशा टीमने गर्दीच्या ठिकाणी, लग्न समारंभ आदी कार्यक्रमात तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन होत असेल तर त्वरीत कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, न.प.मुख्याधिकारी आदी व्हीसीद्वारे उपस्थित होते.