आता सुटीच्या दिवशीही भरा मालमत्ता कर; थकीत वसुलीसाठी जप्ती पथक
कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या व करांचा एकरकमी भरणा करणाऱ्यांना शास्तीत माफी
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या तिन्ही झोनच्या कर पथकाची बैठक मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी घेतली. यावेळी उपायुक्त अशोक गराटे, सहायक आयुक्त विद्या पाटील यांच्यासह प्रभारी झोन सहायक आणि कर पथकातील कर्मचारी उपस्थित होते.
कोविड- १९ विषाणूचा प्रादुर्भाव पसरु नये, यासाठी शासनाकडून माहे मार्च २०२० पासून वेळोवेळी लॉकडाऊन करण्यात आले. त्या काळात व्यापार व व्यवसाय बंद असल्यामुळे व्यापारी वर्ग आणि समाजाचे घटक कामगार वर्ग यांना आर्थिक अडचण निर्माण झाल्यामुळे थकीत कराचा भरणा करता आला नाही. अशा घटकांना दिलासा देण्यासाठी मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्याची घोषणा मनपा आयुक्तांनी केली. ज्या नागरिकांनी थकीत भरलेली नाही, अशांवर जप्ती पथक गठीत करून कारवाई करावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच खूल्या भूखंडधारकांवरही रीतसर दराने वसुली केली जाईल. निनावी खुल्या भूखंडधारकांवर नगर रचना व महसूल विभागाच्या सहयोगाने धारक शोधून थकित वसुली केली जाईल. अन्यथा रीतसर पद्धतीने जप्ती करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
नागरिकांच्या सोयीसाठी आणि वसुलीची टक्केवारी वाढविण्यासाठी शनिवारी आणि रविवारी कार्यालयीन वेळेत झोन कार्यालयात कराचा भरणा करता येईल. करवसुली लिपिकांच्या सहकार्याने सेल्फ हेल्प ग्रुपच्या बचतगट महिल्यांच्या माध्यमातून थकबाकीदारांना मोबाईल फोनच्या माध्यमातून शास्ती माफीची माहिती देण्यात येणार आहे. दर आठवड्याला थकित मालमत्ताधारकांना कर भरण्याची आठवण करून देण्यात येईल.
सन २०२०-२१ पर्यंतचा थकीत मालमत्ता कर व इतर कर तसेच सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर व इतर करांचा दिनांक १० जानेवारी २०२२ ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांना शास्तीमध्ये १००% सूट देण्यात येईल. मात्र या विशेष सुटीचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील सर्व १८ वर्षांवरील व्यक्तींचे कोविड लसीचे दोन डोस पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित मालमत्ताधारकांना ऑफलाईन व ऑनलाईन कराचा भरणा करताना कोविड लसीकरणाचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. शास्ती माफी ही कोविड -19 तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन करण्यात आली असून, सर्व मालमत्ता धारकांनी लसीचे दोन्ही डोस घ्यावे, यासाठी हितावह अट घालण्यात आली असल्याचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी सांगितले.
पाणीकर आणि मालमत्ता कराचे होणार एकत्रीकरण
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून मालमत्ताधारक आणि नळ धारकांना देयके पाठविण्यात येतात. देयक वाटपापासून कर वसुली पर्यंतच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी पाणी कर आणि मालमत्ता कराचे एकत्रीकरण वर्षभरात करण्यात येणार आहे. सध्या पाणी कराचा भरणा पाण्याची टाकी, प्रियदर्शिनी चौक येथील कार्यालयात होत आहे. झोन कार्यालयातदेखील एक डेस्क नेमून पाणीकराचा भरणा करता येईल. कराचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी क्यू आर कोड आणि युपीआय प्रणाली 8 दिवसांत तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.