मास्क न घालणाऱ्या नागरिकांविरोधात मनपाने केली कारवाई
वाहतूक, आस्थापना आणि मंगल कार्यालयाची केली तपासणी
मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166
चंद्रपूर | कोविड-19 विषाणुच्या प्रादुर्भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संदर्भात प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या पथकाने तिन्ही झोनमध्ये बुधवारी मुख्य चौक, आस्थापना आणि मंगल कार्यालयाची तपासणी केली. दरम्यान, विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीकडून 3 हजार रुपयाचा दंड आकारण्यात आला.
राज्य शासनाने निर्गमित केलेल्या नव्या आदेशानुसार लग्न समारंभासाठी कमाल 50 व्यक्ती, अंत्यविधीसाठी कमाल 20 व्यक्ती तर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमास कमाल 50 व्यक्तींनाच परवानगी आहे. स्विमिंग पूल, स्पा, वेलनेस सेंटर पूर्णतः बंद राहतील. हेअर कटिंग सलुन, ब्युटी सलून 50 टक्के क्षमतेने सुरु तर रोज रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील. सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कार्यवाही करण्याची तरतूद आहे.
नव्या आदेशानुसार मनपाच्या पथकाने मुख्य चौक, गोलबाजार, आस्थापना आणि मंगल कार्यालयाची तपासणी केली. आज बुधवारी झोन क्र. 2 ब अंतर्गत येत असलेल्या बागला चौक , सुपर मार्केट व मटन मार्केट येथील व्यवसायिकांना मास्क लावण्याकरिता एक पथक तयार करुण पूर्व सूचना देण्यात आल्या. झोन क्रमांक 2 च्या क्षेत्रात आस्थापना तपासणी करण्यात आली. 40 आस्थापनांपैकी 4 चार आस्थापनांमध्ये मास्क न लावणारे मिळाल्याने त्यांच्याकडून पाचशे प्रमाणे दोन हजार रुपये वसूल झाले. रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्या पाच जणांकडून शंभर रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात आला. झोन क्र.३ चे पथकाद्वारे झोन अंतर्गत येत असलेल्या न्यायालय, रेल्वे स्थानक रोड परिसरात मास्क बाबत दंड आकारण्यात आला. एकूण ४३ आस्थापनामध्ये तपासणी करण्यात आली. यापैकी एका व्यक्तीकडून पाचशे रुपये दंड आकारण्यात आला.
नागरिकांनी बाहेर फिरताना मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.