मनातला भीतीचा व्हायरस निघाला पाहिजे – डॉ.रत्नाकर बांडेबुचे पत्रकार दिनानिमित्त मानसिक स्वास्थ्यावर प्रबोधन

मनातला भीतीचा व्हायरस निघाला पाहिजे – डॉ.रत्नाकर बांडेबुचे

  • पत्रकार दिनानिमित्त मानसिक स्वास्थ्यावर प्रबोधन

भंडारा, दि. 6 : कोरोनाच्या लाटा आल्या व गेल्या, परत येत आहेत. व्हायरस पसरून कोरोनाच्या लाटांनी समाजात नागरिक मोठ्या प्रमाणात बाधित झाले. मात्र कोरोनामुळे आलेला नैराश्याचा मनातला व्हायरस निघाला पाहिजे. अतिविचार करणे टाळले पाहिजे. आनंदात राहीले पाहिजे, असे प्रतिपादन मानसोपचार तज्ञ डॉ.रत्नाकर बांडेबुचे यांनी आज केले.

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकारांसाठी कोरोना काळात मानसिक स्वास्थ्याची गरज या विषयावर श्री. बांडेबुचे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे प्रामुख्याने उपस्थित होते.

पत्रकारीतेच्या काळात माध्यमांना अनेक आव्हानाना सामोरे जावे लागले. माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्यांना ताणतणावाला तोंड द्यावे लागले. त्यासाठी म्हणून मानसिक स्वास्थ्य गरजेचे असल्याचे प्रास्ताविक श्रीमती शैलजा वाघ दांदळे यांनी यावेळी केले.

 जेष्ठ समाजसेविका स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांनी जिल्ह्याच्या पत्रकारीतेचा वारसा यावेळी उलगडून दाखवला. सिंचनासारख्या प्रश्नावर अनेक पत्रकारांनी लिहील्यावर गोसेखुर्द प्रकल्प जिल्ह्यात झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आदर्श व सकारात्मक पत्रकारीता करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अध्यक्षपदावरून बोलतांना जिल्हाधिकारी यांनी अत्यंत सखोल मानसिक स्वास्थ्याची गरज अधोरेखीत केली. मास्कची सवय कायम ठेवल्यास कोरोना काही प्रमाणात सौम्य राहतो असे त्यांनी उदाहरणाने स्पष्ट केले. प्रिंट, इलेक्ट्रानिक व समाजमाध्यमांची बलस्थाने त्यांनी नमूद केली. जिल्ह्यातील माध्यमांनी नेहमीच सहकार्य केल्याचे त्यांनी आवर्जुन नमूद केले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. बबन मेश्राम, आभार पंढरी लुटे यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने विनायक लेकुळे, हिरालाल तलमले, तुषार उरकांदे, रवि उईके, घनश्याम सपाटे, सुनिल फुलसुंगे, युवराज गणवीर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.