कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी मनपाची पूर्वतयारी

कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी मनपाची पूर्वतयारी

महापौर राखी संजय कंचर्लावार घेतला आढावा
 
मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166
चंद्रपूर, ता. ५ : शहरातील रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी पूर्वतयारी आणि व्यवस्था करण्यासह आवश्यक मनुष्यबळ आणि उपाययोजनांचा आढावा महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी घेतला.
महापौर कक्षात पार पडलेल्या बैठकीत उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, सभागृह नेता देवानंद वाढई यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर शहरात चालू आठवड्यात रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे तात्काळ उपचार व्हावे, यासाठी वन अकॅडेमी येथील कोविड केअर सेंटर, आसरा हॉस्पिटल येथे आवश्यक व्यवस्था करण्यावर व्यापक चर्चा करण्यात आली. लग्नकार्य, कार्यक्रम, सोहळे, तेरवी या ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्याचे निर्देश देण्यात आले. शासन निर्देशानुसार कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक मेळावा, कार्यक्रम किंवा नागरिकांचा जमाव बंद जागेमध्ये किंवा मोकळ्या जागेमध्ये आयोजित करतेवेळी उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्ती पुरती मर्यादित ठेवण्यात यावी, असे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले.
महापौरांनी दिलेल्या निर्देशानुसार आयुक्त विपीन पालीवाल यांनी मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आरोग्य आणि स्वच्च्छता विभागाच्या अधिकाऱ्यांची कोविड आढावा बैठक घेतली. बैठकीला उपायुक्त अशोक गराटे, सहायक आयुक्त विद्या पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, स्वच्छता विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके, झोन १चे प्रभारी सहायक आयुक्त सचिन माकोडे, झोन २चे प्रभारी सहायक आयुक्त नरेंद्र बोबाटे, झोन ३चे प्रभारी सहायक आयुक्त राहुल पंचबुद्धे यांच्यासह सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, झोन स्वच्छता निरीक्षक यांची उपस्थिती होती.
मंदिरात दर्शनासाठी जाताना मास्क अनिवार्य; २५ भाविकांची मर्यादा
मंदिरात दर्शनासाठी जाताना मास्क लावणे अनिवार्य असून, मंदिराच्या दर्शनी भागात हँड सानिटायझरची व्यवस्था करण्यात यावी, तसेच शहरात विनामास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मंदिरात आरतीच्या वेळी २५ हुन अधिक भाविक उपस्थित राहणार नाहीत, यांची नोंद घ्यावी. त्यासाठी स्वच्छता निरीक्षकाच्या नेतृत्वातील पथके झोननिहाय तपासणी करणार आहेत, अशा सूचना मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. दुकाने, आस्थापना याठिकाणी ग्राहकांसह सेवापुरवठादारांनी मास्कचा वापर नियमित करावा, आस्थापना व दुकानांमध्ये कोविड वर्तनाचे पालन होत नसल्याचे निर्देश आल्यास अशा आस्थापना दुकानांवर दंड आकारण्यात येणार आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने बाजार आणि रस्त्यावरची गर्दी कमी होईल, याकडे लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले.
कोरोना रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास दंडात्मक कारवाई
शहरात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण होम क्वारंटाईन असल्यास त्या घराच्या दर्शनी भागात प्रतिबंधित क्षेत्र म्हणून फलक किंवा स्टिकर लावण्यात येणार आहे. अशा घरातील व्यक्ती होम क्वारंटाईन असतानादेखील ते लोकांमध्ये खुलेआम मिसळत असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाणार आहे. कोरोना बाबतच्या नियमांचे पालन न करणाऱ्या अशा व्यक्तींवर कडक कारवाई प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येईल. होम क्वारंटाईनमधील रुग्ण कोरोना नियमांच्या विहित कालावधीत बाहेर दिसल्यास मनपाच्या हेल्पलाईन ८३०८८००२७६ या  क्रमांकावर संपर्क साधावा. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या हायरिस्क संपर्कातील व्यक्तीने नियमाप्रमाणे चौदा दिवस क्वारंटाईन राहायचे आहे. मात्र, काही व्यक्ती शहरात फिरताना किंवा इतर लोकांमध्ये मिसळताना आढळल्यास अशांवर कडक कारवाई प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
लसीकरणासाठी पुढे या
नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक दोन डोस घेणे आवश्यक आहे. ज्यांनी एक घेतला असेल त्यांनी तातडीने आपला दोन डोस पूर्ण करावा. १५ ते १८ वर्षांच्या मुलांचे लसीकरण सुरु असून, कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वतःला सुरक्षित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. १५ ते १८ वर्षाच्या मुलांच्या लसीकरणासाठी ऑफलाईन व्यवस्था करण्यात आली आहे.