अनुसूचित जमातीतील मुलींसाठी रोजगाराची सुवर्ण संधी Ø टाटा इलेक्ट्रॉनिक्स देणार प्रशिक्षण व रोजगार
मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166
चंद्रपूर, दि.5 जानेवारी : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास व टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील सुटे भाग निर्मितीच्या क्षेत्रात अनुसूचित जमातीच्या मुलींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षित मुलींना टाटा इलेक्ट्रॉनिक्स मध्येच रोजगार निर्माण करून देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक मुलींची शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, वय 18 ते 20 दरम्यान, वजन कमीत कमी 45 किलो, उंची 145 सेंटिमीटर असावी.
सुरवातीला विद्यार्थिनींना लेखी चाचणी द्यावी लागेल. ज्यामध्ये सामान्यज्ञान, कलाचाचणी आणि काही गणितीय घडामोडीवर लेखी चाचणी आधारलेली असेल. त्यानंतर त्यांना प्रात्यक्षिक परीक्षालासुद्धा सामोरे जावे लागेल. निवड झालेल्या मुलींना टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कडून 24 दिवसांचे विनाशुल्क प्रशिक्षण देण्यात येईल. सोबतच त्यांना यादरम्यान निवास व भोजनाची मोफत सुविधा देण्यात येणार आहे. 24 दिवसांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडलेल्या मुलींना टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड होसुर, तामिळनाडू येथे रोजगार मिळेल.
निवड झालेल्या मुलींना पंधरा हजार रुपये मासिक वेतनासह , जेवण, निवास आणि येणे- जाण्याची सुविधा अत्यंत कमी किमतीत कंपनीमार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. सुरक्षित वातावरणात काम करण्याची संधी या मुलींना मिळणार आहे. तसेच त्यांच्या कामाच्या प्रगतीवर त्यांना कंपनीमध्ये विविध पदावर पदोन्नती होण्याची संधी आहे. याबाबतची अधिकची माहिती व अर्ज करण्यासाठी आदिवासी प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.