कोविड लसीकरणाला बाधा न येऊ देता (जे.ई) मेंदूज्वर लसीकरण मोहीम यशस्वीपणे पार पाडावी-जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166
चंद्रपूर दि.3 जानेवारी: जिल्ह्यात आजपासून (दि.3) 15 ते 18 वर्षे वयोगटासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात होत आहे. आरोग्य विभागाने कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला कोठेही बाधा न येऊ देता जॅपनीज इन्सेफेलायटिस (मेंदूज्वर) लसीकरण मोहीम यशस्वीपणे पार पाडावी. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज येथे केले. सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळा, बाबुपेठ येथे मेंदूज्वर लसीकरण मोहिम शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी,महापौर राखी कंचर्लावार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा उपायुक्त अशोक गराटे, सहाय्यक आयुक्त विद्या पाटील, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक नागेश नीत तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी व शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती असून सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला त्यामुळे स्त्रिया विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळा, बाबुपेठ येथून जॅपनीज इन्सेफेलायटिस या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पार पडत आहे. या शाळेमध्ये 926 विद्यार्थी असून लसीकरणासाठी आरोग्य विभागाच्या 5 टीम कार्यरत आहे. मेंदूज्वर आजाराचा विषाणू माणसाच्या शरीरामध्ये क्युलेक्स डासांमार्फत प्रवेश करतो व त्यानंतर रुग्णांमध्ये विविध लक्षणे आढळून येतात. मेंदूज्वर हा घातक असून यामुळे मृत्यूदेखील होऊ शकतो.
जॅपनीज इन्सेफेलायटिस (मेंदूज्वर) रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महिनाभर 1 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना ही लस देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा.असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने पुढे म्हणाले, आजपासून जिल्ह्यात 15 ते 18 वर्षे वयोगटासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला देखील सुरुवात होत आहे. त्यासोबतच मेंदूज्वर लसीकरण मोहीम देखील पार पडणार आहे. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला कोठेही बाधा येऊ न देता ही लसीकरण मोहीम आरोग्य विभागाने यशस्वीपणे पार पाडावी. तसेच संपूर्ण जिल्ह्यातील पालकांनी आपल्या 1 ते 15 वर्षे वयोगटातील पाल्यांना या लसीचा डोस देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी केले.