‘ओमिक्रॉन’ विषाणू प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन सज्ज नागरिकांनी स्वयंप्रेरणेने काळजी घेणे आवश्यक -जिल्हाधिकारी
संभाव्य असलेल्या तिसऱ्या लाटेसाठी यंत्रणांचा आढावा
लसीकरण एकमेव उपाय
त्रिसूत्रीचा अवलंब अनिवार्य
भंडारा, दि. 30 : दक्षिण आफ्रिकेमध्ये ‘ओमिक्रॉन’ हा कोविड विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासोबतच मास्कचा वापर, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसुत्रीचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. शासन लसीकरण व अन्य बाबींवर काटेकोर अंमलबजावणी करीत आहे. स्वत:चा जीव बहूमुल्य आहे, याची गंभींरतेने जाण ठेवून नागरिकांनी स्वंयंप्रेरणेने लसीकरण करुन त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले. नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी सर्व आरोग्य यंत्रणांची बैठक घेतली.
प्राणवायू निर्मिती संयंत्र प्लांटची (पीएसए प्लांट )सर्व कामे तसेच चाचणी प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याची कारवाई तातडीने पुर्ण करुन आवश्यकता पडल्यास प्लांट तातडीने सुरू करण्याबाबतची कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी यांना दिल्या. तसेच सर्व पी. एस. ए. प्लांटला अग्निशमन यंत्र लावण्यात आले आहे. ऑक्सिजन लाईन बाबत व रॅम्प बाबत कार्यवाही तसेच कोरोना ब्लॉक व जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांकरिता असलेले वार्ड याबाबत सुद्धा त्यांनी आढावा घेतला व त्याबाबत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या.
बालरोग विभागात संभाव्य असलेल्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्व औषधी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती यावेळी जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. वैद्यकीय संसाधने व साहित्य सामग्रीची उपलब्धता, शवगृह बाबत करावयाची कार्यवाही आणि सर्व कोविड रुग्णालयांमध्ये सी.सी.टी.व्ही. लावण्यात बाबतची कार्यवाही पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली.
रुग्णालयांमधील ऑक्सिजन सिलेंडर करता ओटे बांधून घेण्याच्या कारवाईची निरीक्षण करण्यासाठी तातडीने जिल्हा शल्य चिकित्सक, कार्यकारी अभियंता यांनी पाहणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. पूर्ण झालेल्या कामाचे देयक सादर करून संबंधितांनी याबाबत कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.
ओमिक्रॉन या नवीन विषाणूची घातकता पाहता सर्व आरोग्य यंत्रणा व कोविडशी संबंधित कार्यान्वित करणाऱ्या यंत्रणांनी समन्वयाने काम करावे व आलेल्या अडचणी बाबत जिल्हा प्रशासनात अवगत करावे, असे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले.