राज्य सरकारचे शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य – कृषीमंत्री भुसे
Ø पालकमंत्री व कृषीमंत्र्यांनी बांधावर जावून जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा
Ø अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त पिकाची पाहणी
Ø आढावा बैठकीत कृषी विभागाला खड़सावले
चंद्रपूर, दि. 30 : पंधरा दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ, असा विश्वास राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी दिला. तर सिंदेवाही, सावली, मूल, पोंभुर्णा तालुक्यात अतिवृष्टिमुळे नष्ट झालेल्या पिकांची आज पाहणी केली. ज्यांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांच्या मागे राज्य सरकार खंबीरपणे उभे असून शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य आहे, असे मत राज्याचे कृषीमंत्री दादाजी भूसे यांनी व्यक्त केले.
सिंदेवाही, सावली, मूल तालुक्यातील आठ ते दहा गावात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करतांना मंत्रीद्वय बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले, गत 15 दिवसापूर्वी सावली, सिंदेवाही, पोंभुर्णा व मूल आदी भागात अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती असल्यामुळे संपूर्ण धान नष्ट झाले. शेतकऱ्यांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. शेतकऱ्यांचे संकट अतिशय मोठे आहे. याबाबत मंत्रिमंडळात विषय मांडून कृषिमंत्र्यांना नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी विनंती केली. त्यांनी लगेच होकार देत आज जिल्ह्यातील नुकसानग्रस्त धानाची पाहणी केली. शेतकऱ्याचे संपूर्ण बजेट कोलमडले आहे. राज्याचा मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून मी आणि कृषिमंत्री शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. खरीप हंगाम तर हातातून गेला. मात्र, रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ज्वारी, हरभरा अल्पदरात त्वरित उपलब्ध करून देऊ. येत्या तीन ते चार दिवसात अल्पदरात बियाण्यांचे वाटप करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन व कृषी विभागाला दिल्या आहे.
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे. हातातील धान गेल्यामुळे 31 डिसेंबर पर्यंत असलेली धान खरेदीची मुदत फेब्रूवारी महिन्याअखेरपर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कृषिमंत्र्यांना केली. तसेच या परिसरात रानडुकरांचा शेतमालाला प्रचंड त्रास आहे. शेतातील उभे पीक रानडुक्कर नष्ट करत असल्यामुळे डुकरांना मारण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्या.
संपूर्ण पाहणी झाल्यानंतर मूल येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ग्राम स्तरावरील यंत्रणेच्या कामकाजाबद्दल पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. ज्या गावात नुकसान झाले आहे, तेथील पंचनामे तातडीने पूर्ण करून दोन दिवसात अहवाल सादर करावा. शेतकरी अडचणीत असतांना ग्रामीण यंत्रणा कामात हलगर्जीपणा करत असेल तर खपवून घेणार नाही. संबंधित अधिकारी – कर्मचा-यांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
कृषिमंत्री श्री. दादाजी भुसे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील आठ ते दहा गावांमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. वडेट्टीवार आणि संपूर्ण यंत्रणेसह दौरा केला. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. प्रशासनाने याची दखल घेतली असून पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. येणार्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व इतर सर्वांसमोर मांडून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. शेतकरी हिताला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. ज्याचे नुकसान झाले आहे, त्यांच्या पाठीमागे सरकार खंबीरपणे उभे असून संपूर्ण मदत मिळवून देऊ अशी ग्वाही कृषिमंत्री यांनी दिली.
यावेळी मंत्रीद्वयांच्या हस्ते चिमढा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी कल्याण निधी योजनेतून कॅन्सरग्रस्त विनोद वाढई आणि प्रभाकर लेनगुरे यांना तसेच टेकाडी येथील यशोदा कोटरंगे या कॅन्सरग्रस्त महिलेला प्रत्येकी 30 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
पालकमंत्री श्री. वड़ेट्टीवार आणि कृषी मंत्री श्री. भूसे यांनी सर्व यंत्रणेसह सिंदेवाही तालुक्यातील मेंढा (माल) येथील शंकर रावजी रामटेके, तांबेगढ़ी (मेंढा) येथील रामदास बाबूराव मंगाम, तांबेगढ़ी, पालेबारसा
येथील पुष्पावती तुमराम,मंगरमेंढा येथील राजेंद्र वागरे, मुंडाळा येथील काशीनाथ डाचेवार, चिमढा येथील उत्तम लेनगुरे, टेकाडी येथील निर्मला मेश्राम यांच्या शेतातील नुकसानग्रस्त धानाची पाहणी केली. तत्पुर्वी मंत्री महोदयांनी सिंदेवाही येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राला भेट दिली.
यावेळी सावलीचे तहसीलदार परीक्षित पाटील, सिंदेवाहीचे तहसीलदार गणेश जगदाळे, गटविकास अधिकारी संजय पूरी, उपविभागीय कृषी अधिकारी सोनाली गजबे, कृषी विकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके, तालुका कृषी अधिकारी अनिल महाले, मेंढा (माल) च्या सरपंच श्रद्धा गुरनुले यांच्यासह गावकरी उपस्थित होते