मालमत्ता कर वसुलीचा वेग वाढवा स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांचे निर्देश
चंद्रपूर, ता. १८ : कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे मागील दीड वर्षांपासून कर वसुली मंदावली आहे. मात्र, आता सर्व व्यवहार सुरळीत झाले असून, भविष्यात पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मालमत्ता कर वसुलीचा वेग वाढविण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांनी आजच्या आढावा बैठकीत दिले.
महापालिकेचा प्रमुख उत्पन्नाचा स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीच्या यंत्रणेला ‘कोरोना’चे ग्रहण लागले. व्यापार, बाजारपेठ बंद होते. नागरिकांचे खासगी व्यवसाय ठप्प पडल्यामुळे. त्यामुळे आर्थिक फटका बसून महानगरपालिकेची वसुलीची गती मंदावली. मालमत्ता करातुन येणारे उत्पन्न हे महानगर पालिकेच्या उत्पनाचे मुख्य स्रोत आहे. त्यावरच आर्थिक बाजू अवलंबून असल्याने कर वसुली होणे आवश्यक आहे. शहरात एकूण ८७ हजार ३०४ मालमत्ता धारक आहेत. यातील केवळ १८ हजार ६६९ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. ही संख्या अत्यल्प असून, पालिकेच्या तिजोरीवर फटका बसत आहे.
तिजोरीतील खणखणाट भरून काढण्यासाठी स्थायी समिती सभापतींच्या कक्षात बैठक घेण्यात आली. त्यामध्ये नागरिकांनी मनपा झोन कार्यालयात जाऊन तत्काळ मालमत्ता कराचा भरणा करावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी उपायुक्त अशोक गराटे, सहाय्यक आयुक्त विद्या पाटील, कर निरीक्षक सुरेश माळवे यांची उपस्थिती होती.