लसीकरण मोहिमेत भंडारा जिल्ह्याची आघाडी
Ø जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर
Ø जिल्ह्यातील 50 टक्के लोकसंख्येचे लसीकरण
भंडारा,दि.18: कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाने लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. लसीकरणात जिल्ह्याने आघाडी घेतली असून राज्यातील मुंबई, पुणे नंतर भंडारा जिल्ह्याने स्थान पटकावले आहे.
लसीकरण मोहीमेतील निर्णायक टप्पा पार पडला असून जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणांची ही मोठी उपलब्धी समजल्या जात आहे. जिल्ह्यातील 8 लाख 98 हजार 400 नागरिकांपैकी 8 लाख 31 हजार 785 नागरिकांनी पहिला डोस घेतला असून त्याची टक्केवारी 92.57 इतकी आहे. तर 4 लाख 53 हजार 858 लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण हे 50.44 टक्के आहे. कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत लसीकरण हा फार मोठा टप्पा असून जिल्ह्याने 18 नोव्हेंबरपर्यंत निर्णायक मोठा टप्पा गाठला असून जिल्ह्यातील अर्धी लोकसंख्या ही लसीने संरक्षित झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज दिली. जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणांच्या समन्वयाने हे लक्ष्य साध्य झाल्याचे त्यांनी सांगितले. लसीकरण मोहिमेला प्राधान्य देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या सुक्ष्म व योग्य नियोजनाने हा टप्पा गाठता आला आहे.
लसीकरणासाठी राबविलेल्या मोहीमामधून आजपर्यंत जिल्ह्यात 18 ते 44 या वयोगटात पहिला डोस घेण्याऱ्यांची आकडेवारी पाहिल्यास या वयोगटात 78 टक्के तर दुसरा डोस 47 टक्के लाभार्थ्यांनी घेतला आहे. 45 ते 59 या वयोगटात पहिला डोस घेण्याऱ्यांची आकडेवारी 103.96 टक्के तर दुसरा डोस 60 टक्के लाभार्थ्यांनी घेतला आहे. 60 वरील वयोगटात 114 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला तर दुसरा डोस 61 टक्के लाभार्थ्यांनी घेतला आहे.
जिल्ह्यातील सर्व उद्योग, कंपन्या, कारखाने, औद्योगिक व खाजगी आस्थापनांत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण 100 टक्के करून घेण्याचे आदेश नुकतेच प्रशासनाने निर्गमित केले आहेत. तर ज्यांनी पहिलाही डोस अद्याप घेतला नसेल त्यांना आस्थापनांत प्रवेश देण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे.
लसीकरण नाही तर वेतन नाही
सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांना लसीकरण प्राधान्याने करावे. त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करावयाचा आहे. ज्यांनी अद्याप पहिला डोस घेतला नाही तसेच दुसरा डोस प्रलंबित असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन काढण्यात येऊ नये, असे लेखी निर्देशही जारी करण्यात आले आहेत.
प्रशासनाचे आवाहन
कोरोना कमी झाला असला तरी दुर्लक्ष करून चालणार नाही. तरी ज्या नागरिकांचा पहिला डोस व दुसरा डोस अद्याप प्रलंबित आहेत त्यांनी नजिकच्या लसीकरण केंद्रावर जावून तातडीने लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.