श्री नवदुर्गा पतसंस्‍थेची नवनिर्मीत वास्‍तु आनंद व प्रेम देणारे केंद्र ठरावे – आ. सुधीर मुनगंटीवार तळेगांव दशेसर येथील संस्‍थेच्‍या नवनिर्मीत वास्‍तुचा लोकार्पण सोहळा संपन्‍न.

श्री नवदुर्गा पतसंस्‍थेची नवनिर्मीत वास्‍तु आनंद व प्रेम देणारे केंद्र ठरावे – आ. सुधीर मुनगंटीवार

तळेगांव दशेसर येथील संस्‍थेच्‍या नवनिर्मीत वास्‍तुचा लोकार्पण सोहळा संपन्‍न.

श्री नवदुर्गा नागरी सहकारी पत संस्‍थेची तळेगांव दशेसर येथील नवनिर्मीती वास्‍तु सुखकारक लाभकारक आनंददायी ठरावी, ही वास्‍तु धनासोबतच प्रेम देणारे केंद्र ठरावे अशी अपेक्षा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली.

दिनांक १३ नोव्‍हेंबर २०२१ रोजी अमरावती जिल्‍हयातील तळेगांव दशेसर येथील श्री नवदुर्गा नागरी सहकारी पत संस्‍थेच्‍या नवनिर्मीती वास्‍तुच्‍या लोकार्पण सोहळयात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते माजी आमदार अरूणभाऊ अडसड, आ. प्रताप अडसड, श्री नवदुर्गा नागरी सहकारी पत संस्‍थेचे अध्‍यक्ष विठ्ठलराव राळेकर, नरेंद्र रामावत, पंचायत समितीचे सदस्‍य मारोतराव शेंडे, अनिल राठी, उषा सिनखेडे, विजया बांबल, पंत संस्‍थेचे सरव्‍यवस्‍थापक दिनेश बोबडे, शाखा व्‍यवस्‍थापक संतोष पोळ आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, अरूणभाऊ अडसड यांचे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान मोठे असून सहकार क्षेत्रातही त्‍यांनी भरीव कार्य केले आहे. त्‍यांचे विचार आजही ऊर्जावान आहे. या पंतसंस्‍थेचा पाया ज्‍यांनी मजबूत केला त्‍या सर्वांचे स्‍मरण अरूणभाऊंनी केले ही लाख मोलाची बाब आहे. या संस्‍थेचा पाया दगडविटा मध्‍ये नसून प्रेम, आपुलकी, जिव्‍हाळा, वात्‍सल्‍य हा या संस्‍थेचा पाया आहे, असेही ते यावेळी बोलताना म्‍हणाले.

 

नमो मातृभूमी या विचारांवर श्रध्‍दा ठेवत मोठे झालेले आम्‍ही कार्यकर्ते आहोत. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी शेतकर-यांसाठी अनेक योजना राबविल्‍या व त्‍यांची प्रभावी अंमलबजावणी केली. या शिवाय त्‍यांनी सर्वच क्षेत्रांना न्‍याय देत देशाच्‍या प्रगतीमध्‍ये मोठे योगदान दिले आहे. सहकार क्षेत्र सर्वसामान्‍य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी केंद्र सरकारमध्‍ये सहकार विभाग नव्‍याने सुरू करत क्रांतीकारी निर्णय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व सहकार मंत्री अमीतभाई शाह यांनी घेतला आहे. सहकार क्षेत्राच्‍या माध्‍यमातुन समृध्‍दी निर्माण व्‍हावी यादृष्‍टीने नवदुर्गा पतसंस्‍थेसारख्‍या संस्‍था महाराष्‍ट्राच्‍या गावागावात निर्माण होणे आवश्‍यक असल्‍याचे आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.

यावेळी ज्‍येष्‍ठ नेते अरूणभाऊ अडसड यांचेही जोरदार भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक आ. प्रताप अडसड यांनी तर संचालन मंगेश मारूडकर यांनी केले.