स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना द्या – अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांचे शिक्षकांना आवाहन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना द्या

– अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांचे शिक्षकांना आवाहन

– मनपाच्या शाळांची शैक्षणिक आढावा बैठक
 
चंद्रपूर, ता. ११ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र शासनाने आखून दिलेल्या संकल्पनेनुसार चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये उत्साहाने कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना द्या, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी शिक्षकांना केले.

महानगर पालिकेच्या सभागृहात शैक्षणिक आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपायुक्त अशोक गराटे, सहायक आयुक्त विद्या पाटील यांची उपस्थिती होती.  शिक्षण प्रशासन अधिकारी नागेश नीत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त उपक्रम, १८ वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांना मतदार यादीत नाव नोंदविणे, लसीकरणाची मोहीम १०० टक्के पूर्ण करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे, आणि कोरोनाचे नियम पाळून शाळा भरविणे आदी विषयांवर माहिती देण्यात आली.  

यावेळी अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला पुढील वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त विविध कार्यक्रम राबवून अमृतमहोत्सवी वर्षाचा सोहळा साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जास्तीत जास्त स्थानिक, युवा, विद्यार्थी यांचा सहभाग वाढविण्यासाठी शालेयस्तरावर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. निबंध स्पर्धा, देशभक्तीपर गीतांचे कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा घेण्यात याव्यात. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा उपक्रम आयोजित करावेत, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त उपक्रम आयोजित करताना मतदार यादीत नाव नोंदविणे, लसीकरणाची मोहीम १०० टक्के पूर्ण करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी जनजागृती करण्यात यावी, असेही सूचित करण्यात आले.