30 नोव्हेंबरपर्यत शंभर टक्के लसीकरण करण्यावर यंत्रणांनी भर दयावा – जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे
चंद्रपूर दि. 8 नोव्हेंबर: केंद्र शासनाच्या हर घर दस्तक कार्यक्रमानुसार लसीकरणासाठी यंत्रणांनी घरोघरी जाऊन 30 नोव्हेंबरपर्यत लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज दिले. जिल्ह्यातील लसीकरणाच्या उद्दिष्टपुर्तीसाठी आरोग्य विभागाच्या टिम नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तरच लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करता येईल. यासाठी आरोग्य यंत्रणेने गावपातळीवर लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन करुन 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित जिल्हा टास्क फोर्स समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, मनपा आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, अधिष्ठाता डॉ.अशोक नितनवरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुंवर, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, आदी उपस्थित होते.
ज्या तालुक्यांमध्ये लसीकरणाची टक्केवारी कमी आहे. तेथील यंत्रणांनी अधिक सजग राहून लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करावे.तसेच तालुकास्तरावर कार्यरत यंत्रणांनी उपलब्ध मनुष्यबळासोबत बचतगट,तसेच स्वयंसेवी संस्थाची मदत घ्यावी असे श्री.गुल्हाने यांनी सांगितले.